आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे नाव घेऊन कोणीही मार्केटिंग करू नये, राजनाथसिंहांनी मनसेला फटकारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन कोणीही मार्केटिंग करू नये. खोटे बोलून लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यापेक्षा खरे बोलून राजकारण करा. आम्ही पाठिंबा मागितलाच नाही तर देता कशाला,?’ असा सवाल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मंगळवारी पुण्यात मनसेचे नाव न घेता केला. शिवसेनेशी आमची जुनीच मैत्री असून ती भविष्यातही कायम राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
एनडीएला देशात अत्यंत अनुकूल वातावरण आहे. ‘272 प्लस’चे उद्दिष्ट गाठण्यात एनडीएला कोणत्याही अडचणी येणार नाहीत. याशिवाय सुमारे 25 प्रादेशिक पक्षांनी, अपक्षांनी एनडीएला पाठिंबा देण्याची भूमिका दाखवली आहे. एनडीए पूर्ण बहुमतात येणार असल्याने निवडणुकीनंतर कोणाचाही पाठिंबा बाहेरून घेण्याची गरज उरणार नाही. जर-तरचे प्रश्नच राहणार नाहीत, असा विश्वासही राजनाथ यांनी व्यक्त केला.
महायुतीत या, अन्यथा भाजपत विलीन व्हा
राज ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा दिला आहे. याबद्दल पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राजनाथ म्हणाले की, ‘बाहेरून पाठिंबा जाहीर करणार्‍यांनी एक तर महायुतीमध्ये सहभागी व्हावे किंवा भाजपमध्ये विलीन होऊन जावे.’
मुंडेंच्या कृषिमंत्रिपदावर पंतप्रधानांचा निर्णय
मोदी हे एनडीएचे पंतप्रधानपदाचे सर्वमान्य उमेदवार असून त्यांचे पंतप्रधानपद निश्चित आहे. एनडीए सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे कृषिमंत्री होतील का, या प्रश्नावर राजनाथसिंह यांनी ‘तो निर्णय पंतप्रधानांचा असेल,’ असे स्पष्ट केले.