पुणे- स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रातील लोकसभेच्या 9 जागा स्वबळावर लढविणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराला उखडून टाकण्यासाठी जे बरोबर येतील त्यांना सोबत घेऊ असे सांगत आम आदमी पक्षाशी युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक असल्याचे संकेत दिले.
कोल्हापूर, हातकंणगले, माढा, सांगली, बारामती, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा या नऊ जागांवर स्वाभिमानीचे उमेदवार लोकसभेसाठी असतील असे जाहीर केले. कृषीमंत्री शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत निवडणूक लढवतील असे जाहीर केले.
आम आदमी पक्षाशी युती करण्याची आमची तयारी आहे. मात्र त्यांनी त्यांची धोरणे जाहीर करण्याची किंवा त्यावर चर्चा केली पाहिजे. आप शहरी सामान्य लोकांच्या हितासाठी कार्यरत राहणारा पक्ष आहे तर आमचा ग्रामीण व शेतक-यांसाठी लढणारा पक्ष आहे. आमचा एफडीआयला पाठिंबा आहे तर केजरीवाल यांच्या पक्षाचा विरोध आहे. त्यामुळे काही मुद्यांवर चर्चा होण्याची गरज आहे. तसेच काही अटींवर एकत्र येऊ शकतो हे बघावे लागेल. भ्रष्टाचारासारख्या मुद्यांवर आप आणि स्वाभिमानीचे एकच धोरण आहे. यासारख्या अनेक मुद्यांवर एकमत झाल्यास सकारात्मक घडू शकेल. जसे अण्णांच्या जनलोकपाल विधेयकाला आम्ही पाठिंबा दिला होता तसेच अण्णांच्या शेतकरी संघटनेच्या ऊस आंदोलनाला व साखर कारखाना घोटाळ्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आपमधील नेत्यांशी चर्चा सुरु आहे. तसेच येत्या काही दिवसात केजरीवाल व योगेंद्र यादव यांची भेट घेणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. याचबरोबर प्रस्थापित राजकारण्यांना अद्दल घडविण्यासाठी व त्यांचा भ्रष्टाचार नाहीसा करण्यासाठी जे पक्ष पाठिंबा देतील त्यांना सोबत घेऊन निवडणूका लढविण्याची तयारी असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.