पुणे - केंद्र सरकारने धान्याच्या आधारभूत किमतींमध्ये केलेली दोन टक्क्यांची वाढ अन्यायकारक आहे. मोदी सरकार शेतकर्यांचा
विश्वासघात करत आहे, अशी टीका राज्यातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केली आहे.
‘शेतकर्यांच्या मोदींकडून अपेक्षा आहेत. आधारभूत किमतींसंदर्भात मी मोदींना पत्र लिहिणार असून या किमती उत्पादन खर्चाशी निगडित असाव्यात ही आमची प्रमुख मागणी आहे. आम्ही मित्रपक्ष असलो तरी सरकारने शेतकर्यांच्या भावनांशी खेळ करू नये, हे निक्षून सांगावेच लागेल. किमतीचा फेरविचार न झाल्यास आंदोलन छेडले जाईल,’ असे खासदार राजू यांनी निक्षून सांगितले.
हा तर विश्वासघात
‘जाहीरनाम्यात आश्वासने द्यायची आणि सत्तेवर आल्यावर विसरून जायचे, ही बनवेगिरी आहे. शेतमालाला 50 टक्के नफा देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. त्यामुळे मोदींचा इतिहास बाजूला ठेवत शेतकर्यांनी त्यांना मते दिली. त्याची परतफेड ते विश्वासघाताने करत आहेत.’’ रघुनाथ पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना
पद्धतच कालबाह्य
‘शेतमालाचा उत्पादनखर्च काढण्याची सरकारी पद्धतच कालबाह्य झाली आहे. मीदेखील कृषी मूल्य आयोग समितीवर काम केले आहे. तेव्हापासून पद्धतीवरचा माझा आक्षेप आहे. सरकार ठरवत असलेला उत्पादन खर्च आणि व्यवहारातला उत्पादनखर्च यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकर्यांची कायम निराशा होते. मोदींनी निवडणुकीपुर्वी दिलेले 50 टक्के नफ्याचे आश्वासन पाळायला हवे.’ डॉ. बुधाजीराव मुळीक, कृषितज्ज्ञ