आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकरकमी एफआरपी द्या; अन्यथा दिवाळी सुखात जाऊ देणार नाही, शेट्टी यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘उसाची एफआरपी तुकडे करून शेतकऱ्याला दिले जाणार असतील आणि तरीही सरकार बघ्याची भूमिका घेणार असेल तर एकाही कारखानदाराची यंदाची दिवाळी सुखात जाऊ देणार नाही,’ असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दिला.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत अागामी गाळप हंगामाची चर्चा झाली. साखर कारखान्यांना तीन हप्त्यांत एफआरपी अदा करण्याची मुभा दिली असल्याची चर्चा या बैठकीनंतर सुरू झाली. यासंदर्भात शेट्टी यांनी पुण्यात संघटनेची भूमिका स्पष्ट केली.

‘माझ्या माहितीप्रमाणे मुळात मंत्री समितीमध्ये तीन हप्त्यांत एफआरपी देण्याचा निर्णयच झालेला नाही. साखर संघ मात्र ही मागणी रेटण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नव्हे तर कारखान्यांच्या सर्वसाधारण सभांमधूनही आयत्या वेळचा विषय म्हणून एफआरपीचा मुद्दा मांडला जात आहे. घाईगडबडीत त्याला शेतकऱ्यांची मान्यता असल्याचे भासवले जात आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री समितीचा निर्णय मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांनी खुलेपणाने शेतकऱ्यांना सांगावा, ही अामची मागणी आहे. सरकारनेही साखर संघाच्या मागणीला होकार दिला असेल तर मात्र सरकारलाही आम्ही बघून घेऊ. गेल्या वर्षीची थकबाकी अजून मिळालेली नाही. त्यामुळे यंदा मात्र अाम्ही टप्प्याटप्प्याने एफआरपी कदापि स्वीकारणार नाही. एवढेच नव्हे तर एकरकमी एफआरपी दिल्याखेरीज साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही,’ असा इशारा खासदार शेट्टी यांनी दिला.

विठ्ठल वाघ यांना पाठिंबा
कवी विठ्ठल वाघ यांनी आपल्या कवितांमधून शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली आहे. त्यामुळे नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाघ यांना निवडून द्यावे असे आवाहन शेट्टी यांनी केले.

हमीपत्र दिल्याशिवाय गाळप परवाना नाहीच
गेल्या हंगामातली ७५ टक्क्यांपेक्षा जास्त एफआरपी दिलेल्या कारखान्यांनाच यंदा गाळप परवाना दिला जाणार असल्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले. ‘या कारखान्यांकडून उर्वरित एफआरपीदेखील एका महिन्यात देण्याचे हमीपत्र दोनशे रुपयांच्या स्टँपवर घेतले जाणार आहे. त्याशिवाय यंदाचे गाळप सुरू करता येणार नाही. यंदा पाऊस कमी आहे. गाळप उशिरा सुरू केले तर ऊस वाळण्याची भीती असल्याने १५ ऑक्टोबरपासून कारखाने गाळप घेऊ शकतील,’ असेही मंत्री पाटील म्हणाले.

एफआरपी एकरकमीच द्यायला हवी
‘एफआरपी तीन हप्त्यात देण्याची परवानगी मिळावी अशी साखर संघाची विनंती होती. ती सरकारने फेटाळून लावली. १४ दिवसांत एकत्रच एफआरपी दिली पाहिजे; अन्यथा कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यानंतरही साखर संघाचा आग्रह कायम राहिला. त्या वेळी शेतकरी संघटना, शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहून भविष्यात पाहू, असे मुख्यमंत्री त्यांना म्हणाले. परंतु तीन हप्त्यांत एफआरपीदेण्याचा प्रश्नच नसल्याचे मंत्री पाटील म्हणाले.