आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारला खुर्चीची ऊब टिकवायची तर नाक खुपसू नका: राजू शेट्टी यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर- राज्य सरकार समृद्धी महामार्गासाठी दडपशाहीचा वरवंटा फिरवणार असेल तर १९५२ मधले पाणी आंदोलन आठवावे. शेतकऱ्यांची कळ काढली तर काय होते याची जाणीव यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना आहे. सध्याच्या सरकारला सत्तेची ऊब टिकवायची असेल तर उगाच नाक खुपसू नये; अन्यथा त्यांच्याखालच्या खुर्च्याही काढून घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. शिवडे येथे शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना ते बोलत होते. दरम्यान, शासनाशी असहकार पुकारून कुणालाही शेतात येऊ न देण्याचे आवाहन त्यांनी केले.   

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोखळे, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, नितीन रोडे, प्रकाश सानप, शरद लभडे, राजू देसले, पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार यांच्यासह डुबेरे, सोनांबे, गोंदे, पाटोळे, सोनारी, काेनांबे, येथील शेतकरी उपस्थित होते. सध्याच्या मार्गाला पर्याय म्हणून  माळशेज, आळेफाटा मार्गाचा उपाय शेतकरी नकाशासह सरकारपुढे ठेवणार असल्याचे या वेळी संघर्ष समितीने जाहीर केले.   

२०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांची संमती आवश्यक आहे. संमतीशिवाय जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर रक्ताचे पाट वाहतील. विरोधाला गाडून टाकण्याची भाषा कुणी करत असेल तर बळीराजा त्याचाच बळी घेईल. दडपशाहीने जमिनी घेणे ही काय मोगलाई आहे काय, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला.   

शेतकऱ्याच्या नादाला लागू नका   
सिंगूरच्या घटनेची आठवण देताना खासदार शेट्टी यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांचे नाव घेत कठोर शब्दांत सुनावले. शेतकऱ्याच्या नादाला लागू नका. कळ काढली तर काय होते हे अजित पवारांना भेटून माहिती करून घ्या. अन्यथा राधा एकीकडे व कृष्ण दुसरीकडे अशी स्थिती होईल. शेतकरी समृद्धीसाठी एक इंचही जमीन देणार नाहीत. प्रकल्पबाधितांसोबत इतरही शेतकऱ्यांनी उभे राहण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले.   
 
चक्का जामचे नेतृत्व करणार राजू शेट्टी
२६ एप्रिलला शहापूर येथे होणाऱ्या चक्का जाम आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती राजू देसले यांनी केली. आंदोलनाला आपण येणार असून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून शेतकऱ्यांची भूमिका सांगणार आहे. त्यानंतरही जमिनी घेण्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांसोबत लढ्यात उतरणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी जाहीर केले. सत्यभामा पडवळ, संगीता बोडके, कोमल हारक, मीना हारक, हंसराज वडघुले यांनी मनोगत व्यक्त केले. आत्मदहन करून सरकारी  अधिकाऱ्यांना मिठ्या मारण्याचा इशारा विविध वक्त्यांनी या वेळी जाहीर मनोगतातून दिला.   
बातम्या आणखी आहेत...