आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तुम्हीच खोटारडे की तुमचे आरोप खोटे?', राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट पुढाऱ्यांच्या मदतीने सत्ताधारी साखर उद्योगाचा रोडमॅप आखायला निघाले आहेत. याच भ्रष्टांना तुरुंगात डांबण्याची भाषा निवडणूक प्रचारात झाली होती. त्यामुळे भाजपवाल्यांनी निवडणुकीतली भाषा खोटारडी होती हे मान्य करावे किंवा शरद पवार-अजित पवारांवर केलेले आरोप खोटे होते याची कबुली जनतेला द्यावी, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले अाहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसअाय) आयोजित साखर परिषदेच्या आयोजनावर शेट्टी यांनी खरपूस टीका करत विरोध दर्शवला. दहा वर्षे केंद्रात आणि १५ वर्षे राज्यात सत्तेत असूनही पवारांना साखर उद्योगाचे भले करता आले नाही. आता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राज्य सरकार कोणाचे भले करायला निघाले आहे, असा सवाल करत शेट्टी यांनी केला.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्या भ्रष्टाचारी पुढाऱ्यांनी सहकारी कारखाने, बँका बुडवल्या त्यांच्याविरुद्धचे ट्रकभर पुरावे घेऊन भाजपवाल्यांनी मोर्चे काढले होते. सहकार बुडवणाऱ्यांना तुरुंगात डांबण्याचे आश्वासन देत यांनी लोकांकडे मते मागितली, अशी आठवण शेट्टी यांनी करून दिली. पवार सत्तेत असतानाच सहकार चळवळीचे सर्वाधिक नुकसान झाले. सहकारी कारखान्यांची विक्री झाली, असे ते म्हणाले. साखर परिषदेच्या नावाखाली विशिष्ट लोकांची कंपूशाही ‘व्हीएसआय’मध्ये गोळा होत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना निमंत्रण देण्यात अालेले नाही. रावसाहेब दानवे, बाळासाहेब थोरात, बी. बी. ठोंबरे इत्यादी माणसे यांना आठवली नाहीत. ज्यांना कारखाने चालवता आले नाहीत त्यांना बरोबर घेऊन राज्य सरकार कसले धोरण आखणार, असा सवाल शेट्टी यांनी केला.