आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहकार क्षेत्रातील दरोडेखोरांना हाकला; राजू शेट्टी यांचा हल्लाबोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सहकार क्षेत्र हे भ्रष्टाचाराचे कुरण करणार्‍या पांढर्‍या वेशातल्या लुटारू, दरोडेखोरांना या क्षेत्रातून हाकलून लावा, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी हल्लाबोल केला. सहकार क्षेत्रात शिरलेल्या अपप्रवृत्तींचे वास्तव अधोरेखित करत शेट्टी यांनी आकडेवारीनिशी सहकारक्षेत्र मांडले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित सहकार बचाव परिषदेत ते बोलत होते. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, गुजरात सहकारी क्षेत्रातील तज्ज्ञ जयंतीभाई पटेल, बँकिंगतज्ज्ञ विद्याधर अनास्कर, राज्य सहकारी संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ना नफा, ना तोटा तत्त्वावर चालणार्‍या सहकारी संस्थांना आयकर लागू करू नये, अशी मागणीही शेट्टी यांनी या वेळी केली.

शेट्टी म्हणाले, सहकार क्षेत्रातील 106 बँका अवसायानात निघाल्या असून 2200 कोटी रुपयांचे कर्ज बुडाले आहे. 31 हजार 345 दूध संघांपैकी 16 हजार 739 संघ तोट्यात आहेत. 685 सूत गिरण्यांपैकी (हातमाग) 320, तर 1390 यंत्रमाग गिरण्यांपैकी 1058 गिरण्या तोट्यात आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्रात राज्य सरकारने भागभांडवल म्हणून जे 750 कोटी रुपये गुंतवले आहेत, प्रत्यक्षात त्या संस्था अस्तित्वातच नसल्याचे ते म्हणाले.

एकेकाळी बाजार समित्या ही शेतकर्‍यांची मंदिरे होती. आता त्यांनाही कारखान्यांची कळा आली आहे. साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे बनले आहेत. सहकार क्षेत्रातील या अपप्रवृत्तींमुळे एकेकाळी मालक असलेला शेतकरी आज गुलाम बनला आहे.

राज्यातील आठ जिल्हा बँकांचे परवाने रिझर्व्ह बँकेने रद्द केले आहेत. राज्य सहकारी बँकेवरच प्रशासक नेमलेला आहे. महानंदच्या जागेवर जागा हडप करणार्‍यांचा डोळा आहे, असे सांगून शेट्टी म्हणाले, या सार्‍या पार्श्वभूमीनंतरही सहकारातून सामान्यांचा विकास झाला आहे, हे मान्य करावे लागते आणि म्हणूनच सहकाराला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

राजकारणविरहित कारखाने
गुजरातमधील सहकारी साखर कारखान्यांत वा संस्थांमध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही. एकाही सहकारी संस्थेवर राजकीय व्यक्ती नाही. एवढेच नाही, तर गेल्या 40 वर्षांत सहाकरी साखर कारखान्यात एकाही राजकीय व्यक्तीने पाऊलही टाकलेले नाही. आमच्या कारखान्यांनी गेल्या वर्षी प्रतिटन तीन हजार रुपये दर दिला होता आणि यंदा साखर व उसाच्या दरात घट होऊनही आम्ही प्रतिटन दोन हजार 850 रुपयांचा भाव देऊ शकलो, अशी माहिती जयंतीभाई पटेल यांनी दिली.