आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raju Shetty News In Marathi, Hatkangale, Kolhapur

राजू शेट्टींसमोर टेकवले पवारांनी ‘हात’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्र आपला बालेकिल्ला असल्याचे अभिमानाने सांगणारे शरद पवार व अजित पवार या काका - पुतण्याच्या नाकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी चांगलाच दम आणला आहे. 2009 मध्ये कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नसताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करणार्‍या राजू शेट्टींसमोर आता राष्ट्रवादीने हात टेकले असून, यामुळेच आता हातकणंगले हा मतदारसंघ काँग्रेसकडे सोपवण्याची नामुष्की पवारांवर आल्याचे सांगितले जाते. असे असले तरी शेट्टींचा झंझावात रोखण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार मात्र पवारांनीच ठरवला, हे विशेष.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा निवेदिता माने यांचा राजू शेट्टी यांनी दणदणीत पराभव केला होता. ऊसदराच्या प्रश्नासाठी शेट्टी यांनी सरकार व साखरसम्राटांविरुद्ध जे आंदोलन उभारले, त्याला पश्चिम महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे कोणत्याही पक्षाचे पाठबळ किंवा अधिकृत उमेदवारी नसताना शेट्टींच्या रूपाने अपक्ष उमेदवाराला या मतदारसंघात विजय मिळाला होता. इतकेच नव्हे, तर त्या वेळी कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे बंडखोर सदाशिव मंडलिक हे अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यांच्या विजयामागेही शेट्टींचीच ताकद असल्याचे मानले जाते. या विजयामुळे मोठा आत्मविश्वास आलेल्या शेट्टींनी मग बारामतीपासून माढ्यापर्यंत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे जाळे विणून पवार काका-पुतण्यांना जाहीर आव्हान द्यायला सुरुवात केली. ऊसदराच्या मागणीसाठी शेट्टींनी पवारांच्या बारामतीत केलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहून पवार काका-पुतणे अधिकच अस्वस्थ झाले होते. यातूनच मध्यंतरी पवारांनी शेट्टींवर जातिवाचक टीकाही केली होती, त्यावरूनही मोठा वाद उद्भवला होता.

येत्या लोकसभा निवडणुकीत पवार हातकणंगलेतून शेट्टींविरोधात कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र राजू शेट्टींची वाढती लोकप्रियता रोखण्यात अपयश येत असल्याचे पाहून पवारांनी चक्क आघाडीच्या अदलाबदलीत हातकणंगले मतदारसंघ काँग्रेसला बहाल केला. या ठिकाणी काँग्रेसतर्फे माजी खासदार, सहकारातील ज्येष्ठ नेते कलाप्पाणा आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दीड वर्षापासून रणनीती
हातकणंगलेतील संभाव्य अपयशाचा आधीच अंदाज आल्याने पवारांनी दीड वर्षापूर्वीच हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची रणनीती आखली होती. त्यानुसारच कलाप्पाण्णा आवाडे यांना राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्षपदही बहाल करत साखरपट्टा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचे महत्त्व वाढवण्यास हातभार लावला होता. हा सगळा खटाटोप पवार करत असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आवाडे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले; परंतु त्याला फारशी किंमत न देता शनिवारी पंढरपूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात पवारांनी आवाडे यांच्या नावाची घोषणाही करून टाकली. लगोलग मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आवाडे यांना फोन करून उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगितल्याचे समजते. त्यानंतर इचलकरंजीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

कलाप्पाण्णा आवाडेच कशामुळे?
दोन वेळा खासदार, राज्याचे मंत्रिपद भूषवलेले कलाप्पाण्णा आवाडे पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील दिग्गज नेते आहेत. त्यांचे चिरंजीव प्रकाश आवाडे हेदेखील राज्यमंत्री होते. इचलकरंजी आणि परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विविध सहकारी संस्था आणि वस्त्रोद्योग संस्थांच्या माध्यमातून नेते, कार्यकर्त्यांचे जाळे त्यांनी उभारले आहे. राजू शेट्टी यांना गेल्या वेळी जैन समाजाची प्रचंड मते मिळाली होती. त्यांना तोडीस तोड उमेदवार देताना काँग्रेस नेते व शरद पवारांनी जैन समाजातील आवाडे यांचीच निवड केली, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य.

‘स्वाभिमानी’च्या ताकदीला महायुतीचे बळ
पश्चिम महाराष्ट्रात ऊसदराचे आंदोलन करून सरकारच्या उरात धडकी भरवणार्‍या राजू शेट्टी यांना महायुतीत आणण्यात उद्धव ठाकरे व गोपीनाथ मुंडे यांना यश आले आहे. गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करून शेट्टींनी दणदणीत विजय मिळवला होता. यंदा तर त्यांना शिवसेना, भाजप, रिपाइं व रासपचाही पाठिंबा आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने आवाडेंच्या पाठीशी एकत्रित ताकद उभी केली असली तरी शेट्टींना रोखण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

हा माझा नव्हे, तर सामान्य शेतकर्‍यांचा विजयच
पक्षाच्या तथाकथित बालेकिल्ल्यातील आपल्या वाट्याचा मतदारसंघ काँग्रेसला द्यावा लागणे, ही राष्ट्रवादीवर ओढवलेली नामुष्की आहे. हा विजय राजू शेट्टींचा नव्हे, तर जागरूक शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचा आहे. मी केवळ राष्ट्रवादीचा विरोधक नाही; परंतु शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत जो उदासीनता दाखवतो त्याच्याविरोधात माझी लढाई आहे. त्यात शेतकर्‍यांनीच बळ दिल्याने राष्ट्रवादीला उमेदवारही मिळाला नाही, हीच वस्तुस्थिती.’’
खासदार राजू शेट्टी, महायुतीचे उमेदवार (हातकणंगले मतदारसंघातील)