आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raju Shetty News In Marathi, Swabhimani Shetkari Sanghatna, Divya Marathi

तेव्हा दातखीळ का बसली? राजू शेट्टी यांची गृहमंत्री आर.आर.पाटलांवर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - "गेल्या दहा वर्षांत केंद्रीय कृषिमंत्रिपदाच्या कारकीर्दीत शरद पवार यांनी सतरा वेळा कांद्यावरील निर्यातमूल्य वाढवले, चार वेळा निर्यातबंदी घातली, मूठभरांच्या नफेखोरीसाठी अनेकदा साखर निर्यातबंदी लागू केली तेव्हा आर. आर. पाटील यांची दातखीळ बसली होती का?’ असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापुरातील सभेत शरद पवार आणि आर. आर. पाटील यांनी शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेचा खरपूस समाचार शेट्टी यांनी गुरुवारी पुण्यात घेतला. ते म्हणाले, ‘पवारांच्या कृषिमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी त्या वेळी आर. आर. पाटलांनी केली असती तर आता मी त्यांच्या म्हणण्यानुसार लगेच खासदारकीचा राजीनामा दिला असता. सत्तेसाठी शेतक-यांचा कळवळा येणारे राजकारणी आम्ही नाहीत. शेतक-यांसाठीच आम्ही राजकारणात आहोत. त्यामुळे आर. आर. पाटलांनी आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही.’

"मावळात पाेलिसांनी तीन शेतक-यांचे एन्काउंटर केले. त्या वेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला अशी भूमिका आर. आर. पाटलांनी घेतली. कांताबाई ठाकर ही चाळीस वर्षांची शेतकरी महिला त्या आंदोलनात ठार झाली होती. या महिलेने कोणत्या पोलिसावर हल्ला केला होता, याचे उत्तर पाटलांनी द्यावे. शेतक-यांचे सहकारी कारखाने बंद पाडून ते विकत घेणारे राष्ट्रवादीचे अनेक नेते मंत्रिमंडळात आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्हा बँका मोडून खाल्ल्याने शेतक-यांना कर्ज मिळत नाही. याचा शोध आर. आर.नी कधी घेतला?’ असा सवालही शेट्टी यांनी केला.

आंदोलने सुरूच राहतील
शेतक-यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमची आंदोलने यापुढेही सुरूच राहतील. निवडणूक आणि आमच्या आंदोलनांचा काहीही संबंध नाही, असे शेट्टी म्हणाले. केंद्र सरकारला पाठिंबा असूनही आम्ही केंद्रीय कृषिमंत्र्यांचा पुतळा जाळला. दिल्लीत त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यावर अजूनही काहीही पावले उचलण्यात आली नाहीत. जीवनावश्यक वस्तूंमधून कांदा वगळा आणि कांद्याला निर्यात अनुदान द्या, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे. लवकरच त्यावर अपेक्षित निर्णय होण्याची शक्यता आहे, असेही शेट्टी यांनी या वेळी सांिगतले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नफेखोरांशी लागेबांधे
नफेखोर राष्ट्रवादीशी संबंधित देशातले आठ-दहा कांदा व्यापारी एकत्र येऊन कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवतात. या व्यापा-यांचे लागेबांधे राष्ट्रवादी काँग्रेसशी आहेत. नाफेडचे अध्यक्ष कोणाच्या तालावर नाचतात याचीही माहिती केंद्राने घ्यावी. कांद्याच्या उपलब्धतेबाबत नाफेडकडून दिशाभूल केली जाते. नफेखोरी करणा-या कांदा व्यापा-यांना आणि नाफेडच्या कारभा-यांना चाप लावला तर कांद्याचे दर स्थिर राहण्यास मदत होईल, अशी सूचना केंद्रीय अन्न पुरवठा मंत्र्यांना केली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

आबा, कुठले तिकीट देऊ?
‘पाटण्याचे तिकीट काढून देतो. शेट्टींनी तिकडे जाऊन आंदोलन करावे,’ अशी खिल्ली आर. आर. पाटील यांनी उडवली होती. त्यावर शेट्टी म्हणाले, "पोलिस बदल्यांच्या दुकानदारीतून मिळवलेल्या पैशातून आम्हाला तिकीट नको. गरज पडली तर आम्ही पाटण्याला चालत जाऊ, पण आम्हाला तिकीट देण्याची भाषा करणा-या आर. आर. पाटलांना किती आणि कोणकोणत्या गावांची तिकिटे काढून द्यावी? दाभोलकर यांचे खुनी अजून मोकाट आहेत. सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास लागलेला नाही. मुंबई-पुण्यातील बॉम्बस्फोटातील आरोपी बेपत्ता आहेत.’