आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामभाऊ म्हाळगी यांची जीवनशैली अनुकरणीय - राम नाईक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - रामभाऊ म्हाळगी यांचे व्यक्तिमत्त्व हे उप्रकमशील, सतर्क, जागरूक, क्रियाशील व तत्पर असे बहुआयामी होते. समाजात जनसंपर्क कसा असावा याचा आदर्श त्यांनी जीवनात घालून दिला. त्यामुळे त्यांची राजकीय जीवनशैली अभ्यासाचा व अनुकरणाचा विषय असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी मंगळवारी व्यक्त केले.

भारतीय जनता पक्ष आयोजित वाडा संस्कृती अभियान वर्षपूर्ती व रामभाऊ म्हाळगी यांच्या 31व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘स्व.रामभाऊ म्हाळगी यांची राजकीय जीवनशैली’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मेहेंदळे, अ‍ॅड. दादासाहेब बेंद्रे, आमदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, दीपक रणधीर उपस्थित होते.

नाईक म्हणाले, कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधत चांगल्या कामांना प्रोत्साहन देणे व ज्या कमतरता कामात राहिल्या आहेत त्यात सुधारणा करणे या शैलींचा रामभाऊंनी जीवनात वापर केला. त्यांचे साधी राहणीमान व नवीन उप्रकमाची शैली यामुळे ते राजकारणात आघाडीवर राहिले.

आमदार तसेच त्यानंतर खासदारपदी निवड झाल्यावर रामभाऊ म्हाळगी यांनी आपल्या काम करण्याच्या शैलीतून विधिमंडळाच्या कामकाजात स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. मोठमोठ्या प्रश्नांची अगदी सहजपणे उकल करण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे ते संसद गाजवत राहिले. मतदारांनी निवडून दिल्यामुळे त्यांच्याबद्दल असलेले उत्तरदायित्व म्हणून त्यांनी आपल्या कामाचा वार्षिक कार्यवृत्त अहवाल देण्याची पद्धत सुरू केली. सतत कामाचा ध्यास घेत असताना मात्र त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेतली नाही, असे नाईक म्हणाले.

बदलते राजकारण चिंताजनक
डॉ. विश्वास मेहेंदळे म्हणाले, पूर्वीच्या राजकारणातील टीका टिप्पणी व आताच्या काळातील बदल यात मोठे अंतर पडले आहे. सध्याच्या राजकारणात कोण कोणाचा मित्र अथवा शत्रू हे समजत नसून जी दुष्कृत्ये राजकारणात आली आहेत ती चिंताजनक आहेत. देहबोलीतील मांडणी व ओघवते भाषा वक्तृत्व याची सध्याच्या राजकीय नेतृत्वात कमतरता जाणवत आहे.