आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिपदासाठी रामदास अाठवलेंना प्रतीक्षाच !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व राज्यसभा सदस्य रामदास आठवले केंद्रात मंत्रिपद घेण्याच्या तयारीत असले तरी त्यांची प्रतीक्षा अजून संपण्याची चिन्हे नाहीत. आठवले यांना संधी मिळण्याएेवजी महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्याला केंद्रात आणण्यास भाजपा श्रेष्ठींचे प्राधान्य असल्याची माहिती आहे.

केंद्रातील कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याशिवाय राज्यातील विधान परिषदेची जागा अथवा सत्तेचे पद घेण्यास आठवले यांनी स्पष्ट नकार दिला आहे. केंद्रातील मंत्रिपदासाठी त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. मात्र अद्याप त्यांना स्पष्ट आश्वासन देण्यात आलेले नाही.

संसदेच्या आणि विधानसभेच्या येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळात बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी पुन्हा कंबर कसली आहे. खासदार रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात परतल्याने केंद्रातल्या एका राज्यमंत्री पदासाठी महाराष्ट्राला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला देऊ केलेली केंद्रीय मंत्रिमंडळातलीही एक जागा रिक्त आहे. भाजपा आणि शिवसेनेतील सध्याचे संबंध पाहता तेव्हा चुकलेला मुहूर्तही यंदाच्या जुलैमध्येही साधला जाईल का, याबद्दल साशंकता आहे. दरम्यान, आठवले यांच्याबद्दल केंद्रातील नेतृत्त्व अनुकूल नसल्याची भूमिका आठवले यांच्या कानावर अाल्याने त्यांची अधिरता वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.

संभाजीराजांचा "राज्याभिषेक'?: महाराष्ट्राला केंद्रातील मंत्रिपद द्यायचे झाल्यास छत्रपती युवराज संभाजीराजे यांची अनपेक्षितपणे निवड होऊ शकते, शाहू महाराजांचे वंशज म्हणून संभाजीराजांना केंद्रात आणल्यास त्याचा उपयोग उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत होऊ शकतो. तसेच, महाराष्ट्रातील मराठा समाजातील पाया विस्तारण्यासाठीही हा समर्थ पर्याय ठरेल, असे बोलले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...