आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सामना’च्या कर्जातून कवितांनीच मला सोडवले : रामदास फुटाणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सन १९७५ मध्ये झळकलेला चित्रपट ‘सामना’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. पहिल्याच चित्रपटाने प्रसिद्धी मिळवून दिली खरी; पण डोक्यावर कर्जाचा डोंगरसुद्धा उभा केला. या ओझ्यातून माझ्या भाष्यकवितांनी मला मोकळे केले.

एवढेच नव्हे तर शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, दिवंगत विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी यांच्यापासून ते उभ्या-आडव्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचे प्रेम मिळवून दिले तेही या भाष्यकवितांनीच. ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे त्यांचा प्रवास उलगडत होते. निमित्त होते ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या त्यांच्या काव्य मैफलीच्या तिसाव्या वर्षपूर्तीचे.

फुटाणे वयाच्या पंचाहत्तरीकडे झुकले आहेत. ‘भारत कधी कधी’ची तिशी २५ ऑक्टोबरला पुण्यात साजरी होत आहे. या काव्यमैफलीत फुटाणेंसोबत फ. मुं. शिंदे, अशोक नायगावकर, संदीप खरे, अरुण म्हेत्रे आदी अनेक सहभागी होत आहेत.

‘विजय तेंडुलकरांनी ‘सामना’ लिहिण्यासाठी होकार दिला तेव्हाच मी जिंकलो. त्यांनी डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांना डोळ्यासमोर ठेवूनच कथा लिहिली. दीड लाखात चित्रपट होईल असे वाटले होते. पण, तीन लाख १७ हजार लागले. बर्लिन महोत्सवासाठी निवड झाल्यानंतर सिनेमाची प्रिंट पाठवायला कर्ज काढावे लागले. चारशे रुपयेसुद्धा पगार नसलेला, चित्रकलेचा मी साधा शिक्षक. दरमहा कर्जाचे हप्ते सुरू झाले. सन १९८२ पासून ‘जत्रा’मधून कविता प्रसिद्ध होत असल्याने कार्यक्रमासाठी लोक बोलावू लागले. कर्जफेडीसाठी गाडीभाडे आणि दोन हजार रुपये मानधन घेऊ लागलो. १९८६-८७ पर्यंत कवितांमुळे महिन्याची कमाई ३० हजारांपर्यंत गेली,’ असे फुटाणे म्हणाले.

‘सामना’ बहुजनविरोधी
‘सामना’चित्रपट बहुजनविरोधी, मराठ्यांच्या विरोधात असल्याची टीका करून शालिनीताई पाटील यांनी सिनेमाच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांनी सरकारी पातळीवर मदत केली. नर्गिसच्या अभिप्रायामुळे तो बर्लिन महोत्सवासाठीही निवडला गेल्याचे फुटाणे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...