आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdass Athavale Attack On Congress & Raj Thackeray

काँग्रेसने जातीयवादाला खतपाणी घातले, दलितांची मते महायुतीलाच- रामदास आठवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काँग्रेसने कायम जातीयवादाला खतपाणी घातले आहे. काँग्रेसने कितीही प्रचार केला तरी यावेळेला दलित मतदार काँग्रेसला मत न देता महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणतील. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांचा बालेकिल्ला समजला जाणा-या पश्चिम महाराष्ट्रात 10 ते 11 जागा तर विदर्भात सर्वच्या सर्व 10 जागा महायुतीला मिळतील, असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केला.
महायुतीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. याप्रसंगी भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल शिरोळे, प्रदीप रावत, गिरीश बापट, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर, अविनाश महातेकर आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे हे काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांच्यासारखे पैसेवाले उमेदवार नसले तरी ते सामान्य माणसाचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे जनता त्यांना निवडून देईल. तरुणांना नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी पाहण्याचे आकर्षण आहे. तरुणांना भ्रष्ट काँग्रेसचे सरकार बदलायचे आहे. काँग्रेसने आजपर्यंत जातीयवादाला खतपाणी घातले आहे. त्यामुळे त्यांनी कितीही प्रचार केला तरी यावेळी दलित मतदार काँग्रेसला मत देण्यापेक्षा महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणणार आहेत, असे आठवले यांनी सांगितले.
काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 10 ते 11 जागा तर विदर्भात सर्व 10 जागांवर विजय मिळेल. महाराष्ट्रात महायुतीला 48 पैकी 35 ते 36 जागा मिळतील. देशातही एनडीए आघाडीला बहुमत मिळेल व अन्य कोणत्याही पक्षाचा बाहेरून पाठिंबा घेण्याची आवश्यकता पडणार नाही. मागील निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळाल्यामुळे भाजप, शिवसेनेचे उमेदवार पडले होते. मात्र यंदा रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये असल्यामुळे मनसेमुळे कमी झालेल्या मतांची भरपाई होईल आणि महायुतीचे उमेदवार निवडून येतील असेही आठवले यांनी सांगितले.
मतांचे विभाजन टाळण्यासाठी भाजपने मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र राज ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यांनी तयारी दाखविली असती तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समजूत घालून आम्ही महायुतीमध्ये मनसेचे स्वागत केले असते. मात्र इंदू मिल प्रकरणी राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका चुकीची होती आणि त्याला आरपीआयने कडाडून विरोध केला होता. नुकत्याच राज ठाकरे यांच्या पुण्यात झालेल्या सभांना गर्दी दिसली नाही. मनसेची जादू आता जनतेवर चालत नसल्याचे स्पष्ट झाल्याची टीकाही आठवले यांनी राज ठाकरेंवर केली.