आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रांका ज्वेलर्सने कसा तयार केला सोन्याचा कपडा ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- नमुन्यासाठी आधी सोन्याचा छोटा कपडा तयार करण्यात आला. गोलाकार सोन्याचे तुकडे छोट्या छोट्या रिंग्सने जोडून कपडा तयार केला. 14 हजार गोल तुकडे आणि एक लाख रिंग्सपासून संपूर्ण शर्ट बनला आहे.


एक गोलाकार दुस-या गोलाशी चार रिंग्सने जोडला गेला आहे. त्यात एक हजार रिंग्स खराबही झाले. तीन बाय तीन फूट सोन्याचा शर्टपीस तयार झाला तेव्हा तो सामान्य कपड्याप्रमाणे लवचीक झाला. इटालियन मशीनवर असा कपडा सहज तयार झाला असता; पण त्याला पारंपरिक लूक आला नसता, असे रांका सांगतात.


रांका यांनी यापूर्वी पुण्यातील लक्ष्मी मंदिरासाठी सोन्याची साडी, गणपतीसाठी सोन्याची धोती बनवली आहे. पण एखाद्या व्यक्तीचे माप घेऊन सोन्याचा शर्ट शिवण्याची ही पहिलीच वेळ होती. सोन्याचा बेसिक कपडा तयार झाल्यानंतर आता त्याचे शर्टमध्ये रूपांतर करण्याचे आव्हान होते. हा शर्ट दत्ता यांना टोचणार नाही याचीही काळजी घ्यायची होती. माप आणि परफेक्ट फिटिंगसाठी शिवणकामाचा अनुभव असलेल्या व्यक्तीची गरज होती. तेजपाल ज्यांच्याकडे शर्ट शिवून घेतात त्यांच्यावरच विश्वास ठेवला. पण ते वर्कशॉपमध्ये येण्यासाठी तयार नव्हते. रांका यांनी आपले चार बंदूकधारी सुरक्षारक्षक आणि कारागिरांची टीम सोन्याचा कपडा घेऊन शर्ट शिवण्यासाठी टेलरच्या दुकानावर पाठवली. सर्वात आधी इम्पोर्टेड वेलवेटच्या कपड्यावर शर्टचे भाग बनवण्यात आले. शर्टचा मागील भाग, पुढील उजवा, डावा भाग आणि नंतर बाह्या. हे वेलवेटचे भाग सोन्याच्या कपड्यावर ठेवून तो कपडा कापण्यात आला. सोन्याच्या कपड्यावर अ‍ॅसिड आणि केमिकल्सची पॉलिश करण्यात आली. त्यानंतर जरतारीने वेलवेट आणि सोन्याचा कपडा शिवण्यात आला. या कामासाठी दोन रात्री लागल्या. तेही साध्या शिलाई मशीनवर. शिवताना यात अनेक गोलाकार खराब झाले. नंतर हाताने त्यांची फिनिशिंग करण्यात आली. त्यामुळे दत्ता यांच्या फक्त मापाचाच नव्हे तर ते जसे घालतात त्यांच प्रकारच्या कॉलरचा शर्ट तयार झाला. शर्टवर लोगो लावण्यात आला. त्याला स्वारोस्कवी खड्यांनी सजवण्यात आले. गुंड्याही खड्यांच्याच लावल्या.


2 कि लो सोन्यात हा शर्ट तयार होईल असा अंदाज होता, पण तयार झाला तेव्हा 3.3 किलो सोने लागले होते. एकूण खर्च आला 1.27 कोटी रुपये. शिलाई आणि कलाकुसरीवर 8 लाखांचा खर्च. शर्ट ठेवण्यासाठी खास लाकडी बॉक्स तयार करून देण्यात आला. दोन लोकांच्या मदतीनेच तो शर्ट घालावा, अशी दत्ता यांना सूचना देण्यात आली आहे. शर्टसोबत 325 ग्रॅम सोन्याचा एक मॅचिंग बेल्टही तयार करण्यात आला आहे. याशिवाय चार किलो सोने दत्ता घालत असतात. यात सोन्याची साखळी, ब्रेसलेट यांचा समावेश आहे.

परंपरागत व्यवसाय
19 व्या वर्षापासूनच कुटुंबाचा व्यवसाय सांभाळणाºया रांका यांना सोन्याचे दागिने बनवणे आणि दागिने तयार करण्याच्या पद्धतींची माहिती गोळा करणे आणि शिकण्याचा छंद आहे, पण ते स्वत: एकही दागिना घालत नाहीत. सध्या ते गिनीज आणि लिम्का बुकमध्ये दत्ता यांच्या शर्टची नोंद करून घेण्यात व्यग्र आहेत. दत्ता यांच्यासाठी ते सोन्याचा मोबाइलही तयार करत आहेत.