आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरडीवर अत्याचार करणार्‍यांची पोलिस कोठडीत रवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट शाळेत चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणार्‍या बसचालक व मदतनिसाला न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांनीच लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना मंगळवारी विशेष न्यायाधीश एस.डी.धरणे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.
अमोल मारुती शेरकर व विनायक भिकाजी कारंजे (25,मु.रा.बलवडी, सांगोला) अशी आरोपींची नावे आहेत. दोघे सोलापूर जिल्ह्यातील असून व्यवसायानिमित्त पुण्यात आले आहेत. पाच एप्रिल रोजी त्यांनी शाळेच्या बसमध्ये के.जी.वर्गात शिकणार्‍या एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या पालकांनी शाळेत वर्गशिक्षिका, मुख्याध्यापिका यांना हा प्रकार सांगितला. तीन दिवसांनंतरही दोषींवर कारवाई न झाल्याने पालक संघटनेने सोमवारी शाळेची तोडफोड केली होती.
या प्रकरणी दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयात सादर करण्यात आले. हे प्रकरण गंभीर असून मुलीचे अल्पवय लक्षात घेता पोलिसांनी सखोल तपास करावा, असा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींवर भादंवि कलम 354, 34 व प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्सेस अँक्टच्या कलम 6,7, व 8 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तोडफोडीचा गुन्हा दाखल : सोमवारी झालेल्या तोडफोडीच्या प्रकारामध्ये प्रवेशद्वार, काचा, एलसीडी टीव्ही व रिसेप्शन टेबलची काच फुटल्याने एक ते दीडलाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी संस्थेचे सिक्युरिटी इन्चार्ज रामदास निवृत्त कुदळे यांनी डेक्कन पोलिस चौकीत आदित्य माळवे, संजय लाड, ओंकार कदम, उमेश कंधारे, राम बाटुंगे, मोहन पवार, कृष्णा व इतर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.