आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Record Break Crowd In Baramat For Modi's Election Rally, Divya Marathi

पवार काका-पुतण्यांची बारामती ‘मोदी’मय! प्रथमच प्रचंड जनसमुदायाची उपस्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती येथील गुरुवारच्या प्रचारसभेने गर्दीचे सर्व ‘रेकॉर्ड’ मागे टाकले. बारामतीसह पुणे जिल्ह्यातून सुमारे दोन लाख लोकांनी मोदींचे भाषण ऐकण्यासाठी गर्दी केली होती. एवढा प्रचंड जनसमुदाय यापूर्वी बारामतीने कधी पाहिला नव्हता, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उपस्थित लोकांकडून ऐकण्यास मिळाली.

बारामती शहरापासून सुमारे चार किलोमीटरवरील बारा एकर मैदानावर मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. सभास्थळी बरोबर दुपारी तीन वाजता ठरल्याप्रमाणे सभास्थळी मोदी यांचे आगमन झाले. परंतु, दुपारपासूनच सभेचे ठिकाण गर्दीने फुलून गेले होते. मैदान गच्च भरल्याने भोवतालच्या इमारती, झाडे आणि रस्त्यांवरही लोक उभे राहून मोदींना ऐकत होते. मोदींची सभा यशस्वी होण्यासाठी गुजरात सरकारचे दोन मंत्री गेल्या चार दिवसांपासून बारामतीमध्ये ठाण मांडून होते.

‘राष्ट्रवादी’च्या घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांची वेळ दाखवते. गेल्या दहा वर्षांत दहापट भ्रष्टाचार केल्याचे हे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीला आता काही स्थान नाही, अशा शब्दात मोदींनी थेट बारामतीत येऊन शरद पवार, अजित पवारांवर स्पष्ट हल्ला चढवला. यास श्रोत्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अफवांची मोहीमही फसली
मोदींच्या सभेला गर्दी होऊ नये यासाठी काही अफवा उठवण्यात आल्या होत्या. सभेच्या वेळीच बारामतीमध्ये सलमान खान आणि कॅटरीना कैफ राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी येणार असल्याचे मेसेज व्हॉट‌्सअ‍ॅपवरून पाठवले गेले होते. मोदींची सभा रद्द झाल्याचे संदेशही गेल्या दोन दिवसांपासून पाठवले जात होते. मात्र प्रत्यक्षात याचा फार उपयोग झाल्याचे दिसले नाही. मोदींच्या सभेला तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती.

भ्रष्टाचारावर प्रहार, श्रोत्यांचा प्रतिसाद
गेल्या काही वर्षांत बारामती तालुक्यातला पवारविरोध वाढीस लागला आहे. पाणीप्रश्न, दुष्काळ, साखर कारखान्यांतील भ्रष्टाचार यामुळे स्थानिकांचा पवारांवर रोष आहे. मोदींनी या सर्व स्थानिक मुद्द्यांना भाषणात आवर्जून स्थान दिले. ‘सहकारी कारखानदारी तोट्यात असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांचे खासगी कारखाने कोट्यवधींचा नफा कसा कमवतात’, असा प्रश्न करून त्यांनी अजित पवारांनाच टार्गेट केले. त्याला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.

राष्ट्रवादीने घेतला धसका
सभेच्या आदल्या दिवशी बारामती तालुक्यात राष्ट्रवादीचे पदाधिका-यांच्या बैठका लावण्यात आल्या होत्या. सभेला गावातून माणसे जाऊ न देण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती. अजित पवारही पुण्यात तळ ठोकून परिस्थितीवर ‘लक्ष्य’ ठेवून होते. मोदींच्या सभेला मिळणारा प्रतिसाद ते कार्यकर्त्यांकडून जाणून घेत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.