आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेकाॅर्डब्रेक गाेडवा : उसाने दिलेे २० हजार कोटी; राज्यात शंभर लाख टन साखर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाेच्च ऊस आणि साखर उत्पादनाचे वर्ष म्हणून २०१४-१५ या वर्षाची नोंद होईल. यापूर्वीचे सर्व विक्रम मागे टाकत महाराष्ट्राने या वर्षी ९०० लाख टन उसाचे गाळप करून साखर उत्पादनात शंभर लाख टनांचा आकडा ओलांडला आहे. केवळ राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासातही हे उच्चांकी ऊस आणि साखर उत्पादन ठरले आहे.

महाराष्ट्रातल्या सुमारे २५ लाख ऊसउत्पादक शेतक-यांनी यंदा साडेदहा लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली होती. प्रति टन उसाला किमान २२०० रुपये वाजवी आणि किफायती दर (एफआरपी) देणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या विक्रमी ऊस उत्पादनाने महाराष्ट्राच्या झोळीत तब्बल २० हजार कोटी रुपये टाकले आहेत. राज्यातल्या ८० कारखान्यांची धुराडी अजूनही पेटलेली असल्याने ऊस गाळप, साखर उत्पादन आणि ऊस उत्पादकांना मिळणारी रक्कम या आकड्यांमध्ये आणखी भर पडणार आहे. "यंदाचे अंतिम ऊस गाळप ९२५ लाख टन आणि साखर उत्पादन १०५ लाख टनांपर्यंत पोहोचेल,' असा अंदाज साखर आयुक्तालयातील अधिकारी व्यक्त करत आहेत. यापूर्वी २००६-०७ च्या हंगामात ९०.९५ लाख टन साखर आणि २००७-०८ च्या हंगामातील ८८.८ लाख टन ऊस उत्पादन महाराष्ट्रातील सर्वोच्च ठरले होते.

प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील नगर व मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, औरंगाबाद या जिल्ह्यांच्या अर्थकारणाचा कणा ऊस शेती व साखर कारखानदारी आहे. ऊस शेतीचे यांत्रिकीकरण, उत्पादनात येणारे कमी धोके आणि दराची कायदेशीर हमी या तीन प्रमुख कारणांमुळे ऊसशेतीकडे असणारा कल गेल्या दशकात वाढला आहे. साखर हंगाम सुरू झाल्यानंतर लगेच डिसेंबरमध्ये ऊस दरापोटीची सत्तर टक्के रक्कम पहिल्या हप्त्याच्या रूपाने अदा करण्याची पद्धत महाराष्ट्रात रूढ आहे. उर्वरित ऊसदर रक्कम वाटपाचे कारखानानिहाय धोरण वेगळे असते. पुढचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी अंतिम बिल म्हणून शेवटचा हप्ता अदा करण्याची पद्धत आहे.

उत्पादन का वाढले?
"शुगरमॅक्स'चे (अमेरिका) इंडिया हेड प्रकाश नाईकनवरे यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले की गेल्या वर्षी खोडव्याचे प्रमाण कमी होऊन नवीन उसाची लागवड जास्त झाली. यामुळे प्रति एकर उत्पादकता वाढली. बहुतांश शेतक-यांनी अधिक वजन देणा-या ‘फुले २६५' या वाणाला पसंती दिली. सन २०१६ नंतर ठिबकवर उत्पादित न झालेला ऊस गाळपास घेतला जाणार नाही, असा अध्यादेश राज्य शासनाने काढला आहे. यामुळे राज्यातली ४० टक्के ऊस शेती आता ‘ठिबक'कडे वळली आहे. ठिबक सिंचनामुळे खते-औषधांची योग्य मात्रा मिळत असल्याने ऊस चांगला पोसला गेला.

महाराष्ट्राचा झेंडा उंच
देशात आतापर्यंत २६३.५६ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातील साखर उत्पादनाशी तुलना करता हे ३२ लाख टनांनी जास्त आहे. प्रमुख राज्यांचे यंदाचे आतापर्यंतचे उत्पादन असे - (आकडे लाख टनांमध्ये)
राज्य साखर उत्पादन
महाराष्ट्र १००.०३
उत्तर प्रदेश ६८.०
कर्नाटक ४५.०
गुजरात ११.०
तामिळनाडू ८.५०
सीम्रांध्र-तेलंगणा 7.75
(स्रोत - इस्मा)
साखर कारखान्यांना २ हजार कोटींचे कर्ज
साखरेच्या प्रचंड उत्पादनामुळे कारखाने अडचणीत आहेत. शेतक-यांचे पैसे थकू नयेत यासाठी कारखान्यांना २ हजार कोटींचे िबनव्याजी कर्ज दिले जाणार अाहे. ५० लाख टन बफर स्टॉक करावा, अशी मागणी केंद्राकडे केल्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
बाजारात मंदीमुळे काळजीची किनार
"ऊस-साखरेचे विक्रमी उत्पादन अानंददायी असले तरी तरी साखर बाजारात मंदी आहे. पुढचा हंगाम सुरू होताना देशात ९० लाख टन शिल्लक असेल. गेल्या पाच-सहा वर्षांतील नीचांकी भाव सध्याच्या देशी बाजारात आहेत. निर्यातीच्या संधी फारशा नाहीत. आंतरराष्ट्रीय वायदेबाजारात पुढील ११ महिन्यांत दर सुधारणार नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जादा उत्पादित साखर विकायची कुठे, याचे उत्तर शोधण्याचे आव्हान असेल.’
-प्रकाश नाईकनवरे, आंतरराष्ट्रीय साखरतज्ज्ञ.
ऊसाचे क्षेत्र वाढले; उत्पादकता नाही
^"ऊस उत्पादक शेतक-यांची नेमकी संख्या कुठेही उपलब्ध नाही. ऊस क्षेत्राच्या अडीचपट शेतक-यांची संख्या गृहीत धरली जाते. यानुसार देशात ५० लाख ऊस उत्पादक आहेत. यातले २५ लाख महाराष्ट्रात आहेत. १९३० मध्ये संपूर्ण भारतातले ऊस क्षेत्र ११ लाख हेक्टर होते. आता फक्त महाराष्ट्रातच एवढे क्षेत्र आहे. महाराष्ट्राची हेक्टरी उत्पादकता ८४ टन आहे. अर्थात, ऐंशीच्या दशकात राज्याची उत्पादकता हेक्टरी ९१ टनांपर्यंत होती; ती घसरली आहे. क्षेत्रात मात्र वाढ झालीय.'
- डी. बी. फोंदे, वरिष्ठ संशोधक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट.