आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या रक्षणार्थ पिंपरीच्या महिलांचा ‘रेड गँग’ ग्रुप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- नवरा मारझोड करतो. सासू डाग देते. सासरा वाईट नजरेने पाहतो. दीर दारू पिऊन त्रास देतो. गल्लीतली वांड पोरे सतावतात. रस्त्याने जाणारे-येणारे शेरेबाजी करतात. असल्या नित्याच्या तक्रारींवर पिंपरी-चिंचवड परिसरातील ‘रेड ग्रुप‘ने जालीम इलाज शोधून त्याचा धडाक्यात वापर सुरू केला आहे. ‘तत्काळ कृती’ हे ब्रीदवाक्य मानून रेड ग्रुप काम करतो. सुमारे दीडशे महिलांची ही आर्मी जिथून अन्यायाच्या, अत्याचाराच्या तक्रारी येतील, तिथे अँक्शन घेते.

सुमारे दोन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमधील तसेच भोवतीच्या परिसरातील सात-आठ जणींचा ग्रुप एकत्र आला आणि अशा शीघ्र कृती दलाची आवश्यकता जाणवून त्यांनी ‘रेड ग्रुप’ स्थापन केला. घरगुती भांडणे, मारझोड, व्यसने, कौटुंबिक हिंसाचार. तसेच कोवळ्या वयाच्या मुलींना भुलवून पळवणे आणि विकणे, वेश्या व्यवसायास भाग पाडणे, लग्नाचे आमिष दाखवून फसवणे अशा असंख्य जुलमांनी पिचलेल्या महिला बहुसंख्येने असतात. मात्र प्रत्येक वेळी पोलिसांची मदत तसेच न्यायालयीन प्रक्रिया करण्याचे धाडस आणि धीर त्यांच्यापाशी नसतो. होणार्‍या अत्याचाराला तिथल्या तिथे प्रतिकार करण्याचे धाडसही त्यांच्यापाशी नसते. त्यामुळे त्या मूकपणे सोसत जातात. रेड ग्रुप अशा महिलांसाठी शीघ्र कृती दल या भूमिकेतून काम करतो. तसेच महिलांना संकटातून सोडवून प्रसंगी मारमारी करतो, असे ग्रुपच्या सदस्या अँड. मनीषा महाजन यांनी सांगितले.

दीडशेवर सदस्य संख्या
आमच्याकडे दर आठवड्याला किमान तीन-चार तक्रारी येतात आणि आम्ही त्यांची सोडवणूक करतो. रेड आर्मीच आता पिंपरी-चिंचवडमध्ये दीडशेच्या वर सदस्य असल्याचे महाजन यांनी सांगितले.

अशी आहे रेड आर्मी
> सर्व सदस्यांना लाल पोशाख
> ग्रुप साह्यार्थ धावतो, शारीरिक बळही वापरतो
> वकिली - कायदेशीर सल्ला दिला जातो
> पीडितांसाठी समुपदेशन दिले जाते
> तात्पुरता निवाराही सदस्यांच्या सहकार्याने मिळतो
> शक्य तिथे पोलिसांची मदत घेतली जाते.
> समाजात प्रभावी दबावगट म्हणून प्रतिमेचा प्रयत्न