आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rescue Operation Is A Daunting Task At Malin Near Pune

मोठय़ा प्रमाणावर दुर्गंधी, रोगराई पसरण्याचे आता माळीणमध्ये संकट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘सतत तीन-चार दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे माळीणमधील डोंगर खचला. ही दुर्घटना पूर्णत: नैसर्गिकच आहे. डोंगरांमध्ये भातशेतीसाठी सपाटीकरण (पडकाई) करण्यात आले असले तरी याचा थेट संबंध दुर्घटनेशी असल्याचे आढळून आले नाही,’ असा प्राथमिक निष्कर्ष जिऑलॉजीकल सव्र्हे ऑफ इंडियाच्या (जीआयएस) पथकाने काढला आहे. दरम्यान, या भागात आता कुजलेल्या मृतदेहांमुळे मोठय़ा प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

डोंगर खचल्यामुळे झालेला प्रचंड राडारोडा आणि सततच्या पावसामुळे घटनास्थळाचे संपूर्ण अवलोकन करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सविस्तर माहिती घेऊन दुर्घटनेची शास्त्रीय कारणमीमांसा करण्यास आणखी वेळ लागेल, असे या पथकाने सांगितले.
‘जीआयएस’च्या पथकाने माळीण (ता. आंबेगाव) गावाला भेट दिल्यानंतर रविवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. महासंचालक हरभानसिंह, मध्य भारताचे विभागप्रमुख असीमकुमार सहा आदी उपस्थित होते. हरभानसिंह यांनी सांगितले, ‘पाऊस आणखी तीन-चार दिवस सुरू राहिला तर या डोंगराचा उरलेला भागसुद्धा याच पद्धतीने कोसळेल. ही शक्यता गृहीत धरून बचावकार्य करणार्‍या जवानांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आसपासच्या डोंगरांवरील घरेही रिकामी करण्यास सांगितले आहे. तसेच, डोंगरमाथ्यावर काही ठिकाणी पडणार्‍या भेगा, सैल झालेले कडे यावर नजर ठेवण्यास सांगितले आहे.’
मृतदेहांना एकत्रित अग्नी
माळीण दुर्घटनेस रविवारी पाच दिवस झाले. गेल्या 48 तासात पावसाचा जोर ओसरला असल्याने बचावकार्याला वेग आला आहे. राडारोडा उपसणार्‍या यंत्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे. चिखल आणि पावसात चार दिवस राहिलेले मृतदेह कुजण्यास सुरवात झाली असून माळीण परिसरात आता दुर्गंधी पसरू लागली आहे. यातून रोगराई पसरू नये यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केली आहे. मातीत कुजणार्‍या मृतदेहांचा घटनास्थळीच पंचनामा करून त्यांना एकत्रित अग्नी दिला जात आहे.

राज्यातील 387 गावांना धोका
या घटनेचा अभ्यास केल्यानंतर राज्यातील सुमारे 387 गावांना अशा प्रकारचा धोका असल्याचे समजले आहे. याबाबत काळजी घेण्याच्या सूचना आम्ही पुणे जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत, असे डॉ. ‘जीआयएस’चे असीमकुमार साहा म्हणाले.