आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Reservation Not Only To Maratha, But Economically Backward

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरक्षण मराठ्यांनाच नव्हे, आर्थिक दुर्बलांनाही द्या - शरद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांना घटनेने व कायद्याने दिलेल्या आरक्षण तरतुदीला पाव टक्क्याइतकाही हात लावू नका. याउपरही आरक्षण करायचे असेल तर सर्व समाजातल्या आर्थिक दुर्बलांना न्याय दिला पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्वच्छ भूमिका असेल, असे पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात स्पष्ट केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल फक्त मराठा समाजातील घटकांनाच आरक्षण देण्याची भूमिका स्वीकारता येणार नाही, असे पवार म्हणाले.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या राष्टÑवादी काँग्रेस पदाधिका-यांच्या बैठकीत पवार बोलत होते.
ते म्हणाले, मराठा आरक्षणावरून सध्या चर्चा सुरू आहे, पण कोणी भट-भिक्षुक गरीब असेल तर त्याला आरक्षण मिळाले पाहिजे. आर्थिक दुर्बल मुस्लिमांनाही आरक्षणातून बाजूला काढता कामा नये. समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास इतर घटकांनाही आरक्षण द्या, असाच राष्टÑवादीचा आग्रह राहील. उद्या मते मिळाली नाहीतर तरी चालेल, पण कोणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.


मालेगाव स्फोट, इशरतप्रकरणी वक्तव्ये
1. मालेगाव स्फोटानंतर 17 मुस्लिम तरुण
पकडले. तीन वर्षे तुरुंगात काढल्यानंतर ते निर्दोष ठरले. अन्य जातीयवाद्यांनी केलेल्या गुन्ह्यामुळे निष्पाप तरुण नाहक तुरुंगात गेले. या संतापातून कोणाकडून चूक घडली तर संपूर्ण समाजाला विघातक कसे म्हणायचे?
2. इशरत जहाँचे गुजरातेत एन्काउंटर झाले. कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी कोवळी मुलगी अतिरेकी कशी झाली? ज्या कुटुंबावर अत्याचार झाला त्याचा राग दुस-या तरुणाच्या डोक्यात गेला तर त्याला दोषी धरता येणार नाही. उपेक्षित, अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष ही राष्ट्रवादीची प्रतिमा व्हावी.


उमेदवार महिनाभरात
लोकसभेसाठी काँग्रेसला 26, राष्ट्रवादीला 22 या जागावाटपात बदल होणार नाही. काही जागांची अदलाबदल होऊ शकते. याबाबत सोमवारी मुंबईत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होईल. राष्ट्रवादीचे उमेदवार कोण याचा निर्णय महिनाभरात घेतला जाईल. यामुळे तयारीला पुरेसा वेळ मिळेल. म्हणून आतापासून कामाला लागावे लागेल.’
शरद पवार, अध्यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस


बेकायदा बांधकामे, सीलिंग...
०बेकायदा बांधकामांना अभय नाही. पण अचानक लोकांना बेघर करता येणार नाही. यावर राज्याने नीती ठरवावी. अशा कामांना जबाबदार अधिका-यांवर कारवाई करावी.
०‘लँड सीलिंग’ची मर्यादा कमी करण्याचा सरकारचा विचार नाही. तलाठ्याकडे जाऊन खातेफोड करण्याची गरज नाही. यासंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे.