आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औदार्य की नाइलाज?, पवारांना आरक्षणावर भूमिका मांडावी लागल्याची कारणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजात धुमसत असलेल्या असंतोषामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील गड भुईसपाट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बिनीच्या डझनभर नेत्यांचे भवितव्य टांगणीला लागल्यानेच राष्ट्रवादीला या आरक्षणाला पाठिंब्याची भूमिका घ्यावी लागली.
आदिवासी: पारंपरिक मतदार, 84 मतदार संघात प्राबल्य
आदिवासी समाजाची राज्यातील लोकसंख्या 9 टक्के आहे. या समाजासाठी विधानसभेचे 24 आणि लोकसभेचे 4 मतदारसंघ राखीव आहेत. राज्यातील 84 विधानसभा मतदारसंघात आदिवासी मतदारांचे प्राबल्य आहे. 47 उपजाती असलेल्या आदिवासी समाजाला शिक्षण, नोकर्‍या, राजकारणात 7 टक्के आरक्षण आहे. या समाजाकडे दोन-तीन मंत्रीपदे कायम असतात. राज्यातील आदिवासी समाज पारंपरिक काँग्रेसचा मतदार राहिला आहे. त्यामुळे काँग्रेस या समाजाला दुखवण्याच्या बेतात नाही.

धनगर : सव्वा कोटी मतदार, 78 मतदार संघात प्राबल्य
धनगर समाजाचे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात प्राबल्य आहे. 78 विधानसभा आणि 26 लोकसभा मतदारसंघात या समाजाचे प्राबल्य आहे. नोकरी आणि शिक्षणात या समाजाला 3.5 टक्के आरक्षण आहे. मात्र विधानसभा आणि लोकसभेला आरक्षण नाही. विशेष म्हणजे 1 कोटी 27 लाख एवढी मोठी लोकसंख्या असूनही या समाजाचा आजपर्यंत एकही खासदार संसदेत गेलेला नाही. आज धनगर समाजाचे विधानसभेत 4 तर परिषदेत 2 असे सहाच आमदार आहेत.

या नेत्यांची पाचावर धारण
अजित पवार, आर. आर. पाटील, जयंत पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर, राजेश टोपे, बबन शिंदे, हनुमंत डोळस (विजयसिंह मोहिते-पाटील), दिलीप सोपल, श्यामल बागल, लक्ष्मण ढोबळे (राजन पाटील).

मुख्यमंत्र्यांनी केली अडचण
पृथ्वीराज चव्हाण यांचे राजकीय गणित कच्च्े असल्याचे नेहमीच बोलले जाते. पण धनगर आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने तिसर्‍या सूचीचा पर्याय पुढे केला. त्यामुळे राष्ट्रवादीची खरी अडचण झाली आहे.

पवारांमुळेच एनटीत समावेश
धनगर समाजाचा प्रमुख असा नेता नाही. पवार या समाजाचे कर्तेधर्ते होते. त्यामुळे ‘नाना हाकतो’ असे पश्चिम महाराष्ट्रात बोलले जायचे. 1992 मध्ये या समाजाने आरक्षणासंदर्भात आंदोलन केले. त्या वेळी पवारांनी पुढाकार घेऊन त्यांना एनटीचा पर्याय स्वीकारण्यास भाग पाडले होते.