आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - ‘मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेने महाराष्ट्रात परतलेलो नाही, तर कॉँग्रेस आघाडी सरकार सत्तेतून घालवण्यासाठी मी आलोय. मुख्यमंत्रिपदी अपक्ष किंवा ‘रिपाइं’चा आमदार बसला तरी मला चालेल,’ अशी सावध भूमिका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी गुरुवारी घेतली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागलेल्या नितीन गडकरी यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.
भाजपचे पुणे शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी यांना गंभीर आजारामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना भेटण्यासाठी मुंडे पुण्यात आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना मुंडेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही. दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे सरकारने 2 हजार कोटींची मदत दिली पाहिजे. तसेच राज्यातील इतर योजनांमध्ये कपात करून 3 हजार कोटी उभारण्याची गरज आहे. मात्र, सरकारमधले मंत्री आपसात भांडत बसल्याने दुष्काळाग्रस्त जनतेकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. सरकारने दुष्काळ निवारणाचे नियोजन जनतेपुढे मांडले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मुंडे म्हणतात...
* कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातच दलितांवर सर्वाधिक अत्याचार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात मुख्यमंत्री, गृहमंत्री अपयशी.
*प्रदेशाध्यक्षपद बारा दिवसांत ठरेल
*भाजपने मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलेले नाही. लोकेच्छेचा आदर करुनच निर्णय घेऊ.
मठकरींची भेट चर्चेचा विषय
गडकरी गटाचे समजले जाणा-या प्रा. मठकरी यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुंडे यांनी प्रचंड थयथयाट केला होता. मुंडे समर्थकाला डावलून गडकरींनी त्यांची वर्णी लावल्याचा आरोपही झाला होता. तसेच मठकरींची निवड रद्द करण्यासाठी मुंडेंनी थेट ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याकडेही दाद मागितली होती; परंतु गडकरी यांनी सर्व दबाव झुगारून निवड कायम ठेवली. या वादाने मुंडेंनी पक्ष सोडण्यापर्यंत मजल गाठली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत पुण्यात आल्यानंतर मुंडे यांनी मठकरी यांच्याशी संवाद साधला नव्हता. मात्र,गुरुवारी अचानक मुंडेंनी मठकरी यांची भेट घेतल्याने भाजपबरोबरच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.