आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rsp Mahadev Jankar Say\'s, Ncp Wants Breaks The Mahayuti

महायुती तुटावी यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी टपून बसलीयं- महादेव जानकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- शिवसेना- भाजपसह घटक पक्षाच्या महायुतीने काँग्रेस-राष्ट्रवादीचा धुव्वा उडवून लोकसभेत अभूतपूर्व यश मिळवल्याने आघाडी अस्वस्थ आहे. त्यामुळे महायुती तुटावी यासाठी काँग्रेस व खासकरून राष्ट्रवादी टपून बसली आहे. मात्र, महायुतीत काही झाले तरी आम्ही महायुती तुटून देणार नाही. त्यासाठी भाजप-सेनेच्या नेत्यांचे पाय धरण्याची वेळ आली तरी आम्ही ते धरू पण महायुती तुटू देणार नाही असे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी म्हटले आहे. भाजप-सेना नेत्यांत जागावाटपांवरून काही बिनसले तरी पंकजा मुंडेंसह मी स्वत: समन्वयाची भूमिका पार पाडू असेही जानकर यांनी म्हटले आहे.
महादेव जानकर यांचा रासप हा पक्ष महायुतीचा एक घटक पक्ष आहे. धनगर समाजाचे नेते असलेले जानकर सध्या नांदेड येथे आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कामासाठी येथे आले आहेत. त्यावेळी पत्रकारांनी भाजप-शिवसेनेच्या स्वबळाच्या भाषेबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. जानकर म्हणाले, महायुती 100 टक्के सत्तेत येणार आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते कमालीचे अस्वस्थ आहेत. आपल्या विरोधात जनतेचा रोष आहे याची त्यांना आता पूर्ण कल्पना आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप व स्वाभिमानी शेतकरी संघटना याची महायुती एकसंध निवडणूक लढल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला विधानसभेतही मोठा पराभव पत्कारावा लागणार आहे. म्हणूनच महायुती तुटावी यासाठी ते देव पाण्यात घालून बसले आहेत. कधी एकदाची महायुतीची फाटाफूट होती अन् भाजप व शिवसेना वेगळी लढते याची ते वाट पाहत बसले आहेत. मात्र, आम्ही महायुती तुटू देणार नाही. प्रसंगी यासाठी भाजप व सेनेच्या नेत्यांचे पायही धरू असे जानकर यांनी म्हटले. मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुतीला सत्तेत आणण्यासाठी जे जे करता येईल ते मी करायला तयार आहे. पंकजा मुंडे व मी स्वत: महायुतीत समन्वयची भूमिका पार पाडू असे जानकर यांनी सांगितले.