आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाकडून दलित युवकांना धार्मिक शिक्षणाचे धडे; संघचालकांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सामाजिक समरसतेचा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. यात दलित समाजाला मुख्य प्रवाहात सामील करण्याबराेबरच या समाजातील तरुणांना धार्मिक शिक्षणही दिले जात अाहे. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे’, अशी माहिती संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश तथा नाना जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा नुकतीच पार पडली. या सभेतील वृत्तविशेषांची माहिती देऊन प्रा. जाधव म्हणाले, ‘दलित तसेच आदिवासी, वनवासी बांधव मूलभूत सोयी व हक्कांपासूनही वंचित आहेत. त्यांच्यापर्यंत शासकीय योजना अद्याप पोचलेल्या नाहीत. हे लक्षात घेऊन संघाच्या सेवाकार्याचा विस्तार या समाजघटकांसाठी करण्यात येत आहे. दलित बांधवांना प्राथमिक धार्मिक विधींसाठीही पुरोहित मिळत नाहीत. त्यामुळे दलित समाजातील मुलांनाच संघाच्या वतीने धार्मिक शिक्षण देण्यात येत आहे. सुमारे शंभर तरुणांना असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या युवकांना त्यातून रोजगार मिळाला आहे.’

असा आहे विस्तार
संघाच्या प्रतिनिधी सभेत कार्यविस्ताराची त्रैवार्षिक योजना तयार करण्यात आली. गेल्या ३ वर्षांत संघशाखांची १५ टक्के वाढ झाली. जम्मू, आसाम, मणिपूर येथेही शाखा कार्यरत झाल्या. संघाच्या प्रशिक्षणवर्गात ९९ हजार ५८१ तरुण सहभागी झाले. जॉईन आरएसएसच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगद्वारा संघात प्रवेश केलेल्यांची संख्या एक लाख ३० हजार इतकी आहे. संघाच्या एकूण सेवाप्रकल्पांमध्ये १३ हजार ३१ प्रकल्पांची वाढ झाली. देशाबाहेरच्या भारतीयांसाठी ३९ देशांत संघाच्या ७१२ शाखा कार्यरत आहेत. ़

पुण्यात महामेळावा
पुढील वर्षी ३ जानेवारीला पुण्यात पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील स्वयंसेवकांचा महामेळावा ‘शिवशक्ती संग्राम’ या नावाने होणार आहे. सुमारे एक लाख स्वयंसेवक या मेळाव्याला उपस्थित राहतील, असा प्रयत्न आहे. सरसंघचालक मोहन भागवत या मेळाव्याला मार्गदर्शन करतील, अशी माहिती प्रा. सुरेश जाधव यांनी दिली.