आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RTI कार्यकर्ते विलास बारवकर यांची आत्महत्या, चिठ्ठीत वळसे-पाटलांचे नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे जिल्ह्यातील चाकणचे माहिती अधिकार कार्यकर्ते विलास दत्तात्रय बारवकर यांनी मंगळवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. बारवकरांच्या 100 रुपयांच्या बाँडवरील चार पानी आत्महत्यापत्रात विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासह आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या 52 जणांची नावे आहेत.

बारवकर यांनी राहत्या ङरीच सुतळीच्या साहाय्याने घेतला. पंचनामा करताना पोलिसांना त्यांची सुसाइड नोट सापडली. यात वळसे पाटील, नांगरे पाटील, प्रताप दिघावकर, अशोक धिवरे, श्रीकृष्ण कोकाटे, अजय कदम, रघुनाथ जाधव, ए.बी.मोरे, एस.बी.बगाडे, अमर देसाई, अशोक मोराळे, पी.सी.म्हेत्रे, रवींद्र कदम, सुरेश घाडगे अशा अनेक पोलिसांची नावे आहेत.

या परिसरातील राजकीय नेते व पोलिस यांनी संगनमत करून आई, वडील, पत्नी, मुले यांचा अनेक वर्षांपासून अमानुषपणे छळ केल्याचा आरोप बारवकर यांनी केला आहे. 30 ते 40 वर्षांपासून छळ करण्यात येत असून त्या छळाला व बदनामीला कंटाळून फाशी घेत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. पत्रात नावे दिलेले पोलिस व नेत्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सतीश शेट्टींचे हल्लेखोर मोकाट
चार वर्षांपूर्वी पुण्यातच तळेगाव दाभाडे येथे आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या झाली होती. या प्रकरणातील हल्लेखोर अद्याप मोकाटच आहेत. आयआरबी कंपनीच्या एका जमीन घोटाळा प्रकरणातून त्यांना 13 जानेवारी 2010 रोजी दिवसाढवळ्या गोळ्या घालण्यात आल्या होत्या. या प्रकारातही अनेक नेते, पोलिस अधिकारी यासह आयआरबी कंपनीचे अधिकारी यांची नावे तपासात समोर आली होती; पण पोलिसांचा तपास संशयास्पद असल्याने उच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे हस्तांतरित केला. सीबीआयने 500 जणांचे जबाब नोंदवले. 25 संशयितांच्या पॉलिग्राफ चाचण्या घेतल्या. महत्त्वाची माहिती देणार्‍यास 10 लाखांचे बक्षीसही जाहीर केले, तरी पोलिसांना अद्याप हल्लेखोरांचा तपास लागलेला नाही.

देहदानाची इच्छा
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात बारवकर यांनी मृत्यूनंतर देहदानाची इच्छा व्यक्त केली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पंचनामा सुरू केला व मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मात्र, बारवकर यांच्या कुटुंबीय व नातेवाइकांनी दोषी पोलिस अधिकारी व राजकीय नेत्यांवर प्रथम गुन्हा दाखल करा, नंतरच शवविच्छेदन करा असा पवित्रा घेतला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

अनेक प्रकरणे उघड केली
चाकण परिसर औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा असून येथील जमिनींचा भाव अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे या परिसरामध्ये जमीन खरेदी-विक्री प्रकरणातील घोटाळे, अनधिकृत बांधकामे, सहकारी संस्था यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहारही झाले आहेत. त्यातली काही प्रकरणे बारवकर यांनी माहिती अधिकाराचा वापर करून उघड केली होती.