आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओ : ‘दलालबंदी’विरोधात पुण्यात ठिय्या आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयात लागू करण्यात आलेल्या ‘दलालबंदी’च्या आदेशाविराेधात पुण्यातील एजंटांनी मंगळवारी आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने केली. सर्व एजंट्सना अधिकृत प्रतिनिधीचे लायसन्स मिळावे, अशी मागणी करत, सुमारे शंभर ते सव्वाशे एजंटांनी घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.

आरटीओ कार्यालयात पाणी, पार्किंग, बैठक व्यवस्था, पायाभूत सोयी-सुविधा अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत. मात्र, परिवहन आयुक्तांनी त्याकडे लक्ष देण्याऐवजी एजंट्सना ‘लक्ष्य’ केले आहे. आरटीओत एजंट बंद केल्याने शासनाच्या महसुलावर परिणाम होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले. या वेळी एजंट्सच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. ‘मागील ६० वर्षांपासून आरटीओत एजंट व्यवस्था सुरू असून त्याची समाजाला गरज असल्याने ती व्यवस्था टिकून आहे. काही दलाल नागरिकांची पिळवणूक करणारे असून त्यांना आमचा विरोध असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आरटीओ एजंट्सची चाचणी परीक्षा घेऊन त्यांची नियमावली ठरवावी. अधिकृत लायसन्समुळे एजंट जबाबदारीने काम करतील. कामाचे दर शासनाने ठरवल्यास नागरिकांची पिळवणूक होणार नाही,’ आदी मागण्या आहेत. एजंटबंदी मागे घेऊन अधिकृत प्रतिनिधींचे परवाने दिले जात नाहीत तोपर्यंत आम्ही कामावर बहिष्कार टाकणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

नाशकात घटला ३० लाखांचा महसुल
नाशिक : परिवहन विभागात एजंट आणि अनाधिकृत व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आल्याने चार दिवसांत नाशिकच्या आरटीओ कार्यालयाचा महसूल ३० लाखांनी घटला आहे. एजंटमार्फत काम करून घेण्याची सवय लागल्यामुळे ब -याच नागरिकांना अनेक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. त्यातच विभागातील मार्गदर्शन केंद्रात माहितीचा अभाव असल्यामुळेही नागरिक त्रस्त आहेत.