पुणे - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नुकतेच प्रकाशित झालेले आत्मचरित्र लवकरच मराठी भाषेतही उपलब्ध होणार आहे. अनुवादाच्या क्षेत्रात अग्रेसर असणा-या मेहता पब्लिशिंग हाऊसने या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे हक्क मिळवले आहेत.सचिनने लिहिलेल्या ‘प्लेईंग इट, माय वे’ या मूळ इंग्रजीतील आत्मचरित्राचा मराठी अनुवाद येत्या तीन महिन्यांत वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी माहिती मेहता पब्लिशिंगचे सुनील मेहता यांनी दिली. आम्ही मराठी अनुवादाचे हक्क मिळवले आहेत. लवकरात लवकर सचिनचे हे आत्मचरित्र आम्ही मराठी वाचकांपर्यंत आणू, असे मेहता यांनी सांगितले.
सचिनची झळाळती, विक्रमी क्रिकेट कारकीर्द या पुस्तकात आहेच, पण त्याची जडणघडण, खेळाविषयीचे प्रेम, कुटुंबीयांचा पाठिंबा, गुरूंचे मार्गदर्शन, त्याची मेहनत, लहान वयापासून त्याने केलेले विक्रम, २२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अनुभव आणि इतर अनुभव आता मायमराठीत येणार असल्याने सरसकट इंग्रजी न वाचणा-या पण सचिनवर प्रेम करणा-या वाचकांनाही पुस्तकाचा आनंद घेता येणार आहे. एकूणच मराठीतील सचिनचे आत्मचरित्र वाचकांना पर्वणीच ठरणार आहे.