आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू शेट्टींच्या ‘आत्मक्लेशा’कडे सदाभाऊंची पाठ, यात्रेतील शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांची ‘आत्मक्लेश पदयात्रा’ साेमवारी सकाळी पुण्यातल्या भिडे वाडा येथील महात्मा फुले स्मारकापासून निघाली. महात्मा फुले यांना आदरांजली वाहून शेट्टी यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली. संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी मात्र या यात्रेकडे सपशेल पाठ फिरवली. खोत यांच्या अनुपस्थितीबद्दलची तीव्र नाराजी यात्रेत सहभागी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली गेली.  
 
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, तृतीयपंथी कार्यकर्ते लक्ष्मी त्रिपाठी या वेळी उपस्थित होते. संघटनेचे राज्यभरातून अालेले पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची अनाथ मुले यात्रेत सहभागी झाली आहेत.  
 
‘खोत यांनी यात्रेत पूर्ण वेळ सहभागी व्हावे. ते जमत नसेल तर पाहुण्यासारखे येऊ नये,” असे शेट्टी यांनी यात्रा सुरू होण्यापूर्वी बजावले होते. त्यामुळे खोत काय करणार याकडे संघटनेचे लक्ष लागले होते. मात्र खोत यांनी शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेकडे पाठ फिरवणेच पसंद केले.
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष माणिक कदम यांनी सांगितले, की ‘आत्मभान हरवलेल्या राज्यमंत्र्याला शेतकऱ्यांशी घेणेदेणे राहिलेले नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते तळपत्या उन्हात पदयात्रेत सहभागी झाले आहेत. मात्र संघटनेच्या जिवावर मंत्रिपद मिळालेले खोत सरकारी गाडीतून दौरे करून शेतकऱ्यांच्या दुःखाला डागण्या देत अाहेत,’ अशी टीका कदम यांनी केली. खोत यांच्या अनुपस्थितीचा निषेध त्यांनी नोंदवला. यात्रेत सहभागी बहुतांश शेतकऱ्यांची हीच भावना होती.  
 
पदयात्रा सुरू होण्यापूर्वी राजू शेट्टी म्हणाले, ‘गर्दी गोळा करण्यासाठी किंवा शक्ती प्रदर्शनासाठी ही पदयात्रा नाही. शेतकरी नेता म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता येत नसल्याचा आत्मक्लेश करून घेण्यासाठी मी चालत मुंबईला निघालो आहे. साडेसहा लाख शेतकऱ्यांनी भरून दिलेले कर्जमाफीचे अर्ज ३० मे रोजी राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहे. मात्र खोत यांचा कथित भाजप प्रवेश माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. वेळ आल्यानंतर योग्य ते उत्तर देईन’, असे सांगत त्यांनी खोत यांच्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही शेट्टींनी टीका केली. ‘स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू. शेतमालाला हमी भाव देऊ.
 
शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू. यासारखी आश्वासने नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात संपूर्ण देशवासियांना दिली होती. पंतप्रधान झाल्यापासून मात्र या संदर्भात त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला असून त्यांनी आमची फसवणूक केली आहे,’ असे शेट्टी म्हणाले. आत्मक्लेश यात्रा ही केवळ सुरुवात आहे. भविष्यात आंदोलनाची व्याप्ती तीव्र करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासोबतच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मंजूर होईपर्यंत शांत राहणार नसल्याचे ते म्हणाले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा प्रतिनिधी म्हणून आशिष पाटील याने भावना व्यक्त केल्या. कर्ज आणि सरकारी धोरण वडिलांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचे त्याने सांगितले. ‘कर्जाने खचलेल्या शेतकऱ्यांनी व्यसनाच्या आहारी जाऊन आत्महत्या करू नये,’ अशीही विनंती त्याने केली.  

पदयात्रेला मदत  
दहा दिवसांच्या आत्मक्लेश यात्रेला गावोगावच्या शेतकऱ्यांकडून मदत येत आहे. साखर, तेल, तांदूळ, बेसन, कांदे-बटाटे, लसूण, पत्रावळी आदी वस्तूंसह लाखो रुपयांची रोख मदत शेतकऱ्यांनी राजू शेट्टींना पाठवली आहे. शेट्टी यांच्या शिरोळ लोकसभा मतदारसंघातून दररोज ट्रकभर भाकऱ्या पाठवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. चहूकडून येणारा मदतीचा प्रचंड ओघ पाहून यात्रेचे आयोजक भारावून गेले आहेत.

राेज २० किमीचा टप्पा
पुण्यातील महात्मा फुले स्मारक ते आकुर्डी येथील खंडोबा मंदिर हा २२ किलोमीटरचा टप्पा पहिल्या दिवशी पूर्ण करण्यात आला. मंगळवारी ही यात्रा आणखी २० किलोमीटर चालून मावळ तालुक्यातील वडगाव येथे मुक्कामास पोचणार आहे. प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पदयात्रेत गर्दी केली आहे.  
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, अनुपस्थितीबद्दल काय म्‍हणाले सदाभाऊ खोत...
 
बातम्या आणखी आहेत...