आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी; मंत्रिपद शाबूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची अखेर संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपच्या सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दलचा निर्णय मात्र ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी अद्याप घेतलेला नाही. असे असले तरी भाजपच्या काेट्यातून खाेत यांना मिळालेल्या अामदारकीवर व मंत्रिपदावर फारसा परिणाम हाेणार नसल्याचे चित्र अाहे.  

स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि खोत यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने त्यांच्यावरील कारवाई निश्चित आहे. त्यानंतर खोत वेगळी शेतकरी संघटना काढणार असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने ४ जुलैला सर्वप्रथम दिले होते. त्याप्रमाणे खोत यांची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखालील संघटनेच्या समितीने सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन निर्णय घोषित केला. समितीचे सदस्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे या वेळी उपस्थित होते. खोत यांनी २१ जुलैला समितीपुढे स्वतःची बाजू मांडली होती. खोतांच्या हकालपट्टीमुळे संघटनेत दुफळी माजण्याची चिन्हे आहेत. संघटनेतील किती कार्यकर्ते खोत यांच्या पाठीशी राहणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

‘स्वाभिमानी’च्या चौकशी समितीने केलेल्या आरोपांमुळे खोत यांच्यापुढील आव्हाने वाढली आहेत. सावंत यांनी सांगितले, ‘चळवळीतील कार्यकर्त्याचा इतिहास एका दिवसात पुसून टाकणे अन्यायकारक असल्याने आम्ही सदाभाऊंच्या स्पष्टीकरणातील सर्व पैलू लक्षात घेतले. राजू शेट्टी यांना या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य समितीला देण्यात आल्याने त्यात त्यांनी हस्तक्षेप केला नाही. खोत यांच्या चळवळीवरील निष्ठांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सत्तेच्या माध्यमातून व्यक्तिगत समृद्धी महामार्ग निर्माण करण्याचे काम त्यांनी चालवले आहे. त्यांच्या नैतिक वर्तनाचीही जाहीर चर्चा  होऊन त्यांच्या चारित्र्याभोवती संशय निर्माण झाला. त्याचा परिणाम संघटनेच्या नैतिक शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरू शकतो, असे सावंत म्हणाले.  

सत्तासुंदरीची सदाभाऊंना लालसा
‘आजवरचा लढा समाजासाठी आहे की आजपर्यंत केलेल्या लढ्याची वसुली करून व्यक्तिगत जीवनात भोगवाद व चंगळवाद करण्यासाठी, याचा शोध सदाभाऊ खोत यांनी घेतला पाहिजे. सत्तासुंदरीचा स्पर्श झाल्यानंतर त्या भोगवादाचा आनंद कोणीही हिरावून घेऊ नये म्हणून मंत्रिपदाच्या रूपाने सोन्याची कणसे येणारी मंत्रालयातली जी शेती त्यांच्या हाती लागली आहे, ती ते सहजासहजी सोडणार नाहीत. ही स्पष्ट लक्षणे खोतांच्या वागण्याबोलण्यातून दिसत आहेत,’ असा आरोप ‘स्वाभिमानी’ने केला आहे.

नैतिकता दाखवा... 
‘ज्या संघटनेच्या बळावर आमदारकी मिळवली, मंत्रिपद मिळवले त्याच संघटनेतून काढून टाकल्यावर या पदांवर राहायचे का? ही नैतिकता दाखवण्याची परीक्षा खोतांना द्यावी लागेल. त्यांचे चारित्र्य व चळवळीप्रति बांधिलकी सिद्ध करण्याची त्यांना यामुळे संधी मिळाली आहे.’
- दशरथ सावंत, कार्यकर्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
 
हे ही वाचा...
 
बातम्या आणखी आहेत...