आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sahitya Mahamandal Preparing For Vishwa Sahitya Sammelan

खर्च उचलू, पण विश्व संमेलन करूच, साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पंजाबमधील घुमानचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उरकल्यावर साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आता विश्व मराठी साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत. मात्र, पूर्वानुभव पाहता, ‘फुकटेगिरी’ न करता परदेशवारीचा निम्मा खर्च उचलण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी दाखवल्याचे सूत्रांनी सांगितले.

विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी चाचपणी सुरू झाली आहे. दक्षिण अफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील उद्योजक राजू तेरवाडकर यांनी तेथील मंडळातर्फे संमेलनाच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. मात्र, विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या नावाखाली महामंडळाच्या सदस्यांची भलीमोठी यादीच परदेशवारी करणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर इतक्या खर्चाची तयारी नसल्याचे त्यांनी कळवले, असे सूत्रांकडून समजले.

यापूर्वी सॅनहोजे, दुबई आणि सिंगापूरच्या मंडळींनी महामंडळ सदस्यांच्या विदेशवाऱ्यांचा खर्च मुकाट सोसला होता; पण त्यानंतर कॅनडाच्या मंडळींनी या खर्चाविषयी असमर्थता दाखवून विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन रद्द केले होते. तोच प्रकार जोहान्सबर्गला घडण्याची शक्यता लक्षात घेत महामंडळ पदाधिकाऱ्यांनी संमेलनच रद्द होण्यापेक्षा निम्मा खर्च उचलण्याची तयारी दर्शवल्याचे समजते.

सरकारी मदतीवर भिस्त
महामंडळाच्या बैठकीत सदस्यांनी निम्मा खर्च उचलण्याची तयारी दर्शवल्याची माहिती मिळाली. तसेच याआधीच्या विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने २५ लाखांची मदत केली होती. त्याचाही पाठपुरावा करण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात जोहान्सबर्गला चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत आणि निम्मा खर्च करू, पण विश्व संमेलन करू, अशी महामंडळ सदस्यांची मनीषा असल्याचेही स्पष्ट झाले आहे.