आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनाध्यक्षांच्या भाषणाच्या प्रती अखेर छापल्या, इशाऱ्यानंतर महामंडळाची तत्परता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण २६ जानेवारीपर्यंत छापून प्रसिद्ध करावे, अन्यथा उपाेषणाला बसेन,’ या संमेलनाध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या इशाऱ्यामुळे हादरलेल्या साहित्य महामंडळाने तातडीने भाषणाच्या प्रती छापून सबनीस यांच्याकडे सुपूर्द केल्या. मात्र, ‘आता या प्रतींचे वितरण साहित्य रसिकांना करण्याची जबाबदारीही त्यांनी येत्या आठ दिवसांत पार पाडावी,’ अशा अटी घालत डॉ. सबनीस यांनी अद्याप हा वाद संपला नसल्याचे सूचित केले.
प्रत्येक संमेलनाध्यक्षांचे भाषण साहित्य महामंडळ छापून वितरित करते. मात्र, या वर्षी विविध वादांत अडकल्याने अध्यक्षीय भाषण विलंबाने महामंडळाकडे पोहोचले. त्यामुळे ते छापण्यास अवधीच उरला नाही, असे सांगत महामंडळाने भाषण छापण्याकडे कानाडोळा केला होता. मात्र, सबनीसांनी भाषण न छापल्यास उपोषण करण्याचा इशारा दिल्याने हादरलेल्या महामंडळाने घाईघाईत हे भाषण छापून घेतले. या छापील भाषणाचे प्रकाशन सबनीस यांच्या निवासस्थानी सामान्य रसिकांच्या उपस्थितीत बुधवारी उरकण्यात अाले.

काम पूर्ण करावे
‘अध्यक्षाचे भाषण छापणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. ती पाळली. आता वितरणही अाठ दिवसांत करावे. जय वा पराजय कुणाचा झाला यात रस नाही. महामंडळाने आपले काम करावे.
डाॅ. श्रीपाल सबनीस, संमेलनाचे अध्यक्ष

महामंडळ अनुपस्थित
भाषणाच्या प्रकाशनासाठी सबनीसांनी निमंत्रण देऊनही एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. हे सर्व पदाधिकारी दुपारी डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या अंत्यसंस्काराला मात्र उपस्थित होते. ‘महामंडळाने भाषण छापले, मात्र पदाधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहण्याची दक्षता घेतली,’ अशी टिप्पणी सबनीस यांनी त्यावर केली.

अंत्यसंस्काराला सबनीस अनुपस्थित
ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे बुधवारी निधन झाले. मात्र, मराठीचा, संस्कृतीचा, परंपरांचा सतत उल्लेख करणाऱ्या संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी दभिंच्या अंत्यसंस्काराला मात्र उपस्थिती लावली नाही, याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरू होती.