आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sahitya Sammelan Started With Granthdindi In Pimpri Chinchwad

सारस्वतांचा साेहळा : ग्रंथदिंडीत साकारली मराठी परंपरा, संमेलनास पिंपरीत थाटात प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्ञानाेबा-तुकाेबा साहित्यनगरी, पिंपरी - तरुणाईचा सळसळता उत्साह, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि मराठी संस्कृतीविषयीचा जिव्हाळा व्यक्त करणाऱ्या दिमाखदार ग्रंथदिंडीने शुक्रवारी पिंपरीतील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रारंभ झाला. पारंपरिक पोशाखातील शेकडो महिला, कॉलेज युवती यांचा सहभाग हे ग्रंथदिंडीचे आकर्षण ठरले.

दुपारी दोनच्या सुमारास पिंपरी- चिंचवड महापालिकेपासून ग्रंथपूजनाने दिंडीला प्रारंभ झाला. तेथून दिंडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी आली. डॉ. आंबेडकरांना अभिवादन करून ग्रंथदिंडीने मुंबई-पुणे महामार्गावरून संत तुकारामनगरमार्गे मार्गक्रमणा केली. ग्रंथदिंडीतील पालखीमध्ये सकल संतगाथा, फुले-आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचे ग्रंथ आणि राज्यघटना यांचे पूजन करण्यात आले.

शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची लेझीम, ढोल-ताशा, झांज पथके, ध्वजपथके दिंडीच्या समवेत प्रात्यक्षिके करत जात होती. रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक नागरिकही दिंडीकऱ्यांचे उत्साहाने स्वागत करत होते.

आकर्षक चित्ररथ
मराठी साहित्यातील संत, पंत आणि तंत कवी परंपरांचा वारसा सांगणारा चित्ररथ हेही ग्रंथदिंडीचे एक आकर्षण ठरला. विविध संतकवींचे, पंतकवींचे आणि तंतकवींचे (शाहिरी परंपरेचे) प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तिरेखा चित्ररथातून प्रेक्षकांना अभिवादन करत होत्या. खास मराठी बाणा सांगणाऱ्या अब्दागिरीचे पथकही लक्ष वेधून घेत होते. शिंग, तुतारीवादनाचा कल्लोळ लेझीम आणि ढोलांच्या आवाजात मिसळला होता. दिंडीच्या अग्रभागी राजमाता जिजाऊ तसेच बालशिवाजी, पेशवाईचे मानकरी, स्वातंत्र्यसंग्रामातील नेते यांच्या पोशाखातील मुलेही होती.

सबनीस उवाच
ग्रंथदिंडीत नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आवर्जून सहभागी झाले होते. माध्यम प्रतिनिधींपाशी मनोगत मांडताना ते म्हणाले, ‘वाद-संवाद ही मराठी संस्कृतीचीच परंपरा आहे. आता वाद संपले आहेत. संवादपर्व सुरू झाले आहे. त्याचे सूचन ही ग्रंथदिंडी करत आहे. सत्य, सुंदर, मंगलाची आराधना करणारी आणि सर्वार्थाने वैभवसंपन्न अशी ही ग्रंथदिंडी आहे. सर्व ज्ञानपरंपरांचा सन्मान व सहभाग या दिंडीत आहे. हेच संवादसंचित संमेलनाच्या सर्व दिवसांमध्ये जपले जाईल, असा विश्वास वाटतो.’

मंगळागौरीचे खेळ अन् वारकऱ्यांची दिंडी
ग्रंथदिंडीसोबत सुमारे ७५ महिलांचे पथक गटागटाने मंगळागौरीचे खेळ करत चालले होते. हे खेळ पारंपरिक पद्धतीचे असल्याने ते पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील आणि नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी हातात हात गुंफून घातलेली फुगडी सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली. ग्रंथदिंडीमध्ये डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. सदानंद मोरे, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, पिंपरी- चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांच्यासह खासदार अमर साबळे उपस्थित होते. ग्रंथदिंडीच्या सोबतीने पर्यावरणाचा जागर करणारी पर्यावरण दिंडी, माहिती तंत्रज्ञानवाल्यांची आयटी दिंडी, उद्योगनगरीचे प्रतिनिधित्व म्हणून कामगार दिंडी, देहू-आळंदीचे सान्निध्य म्हणून वारकऱ्यांची दिंडी असे वैविध्य होते. त्या त्या दिंडीला पूरक असे पोशाख परिधान करून तरुणाई मोठ्या संख्येने या दिंड्यांमध्ये दिसत होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ग्रंथदिंडीचे काही PHOTOS