आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेदांपलीकडील मानवतेचे दर्शन घडवते ‘साहित्य’- प्रसिद्ध लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - साहित्य माणसाच्या विचारशक्तीला चालना देते. त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीला जागे करते. मतपरिवर्तन करू शकते. त्याच्यातील माणुसकी जागी करते. सार्‍या भेदांपलीकडच्या मानवतेचे दर्शन घडवते. साहित्याचे मध्यवर्ती केंद्र माणूस असल्याने हे सारे घडते.
माणसाला लेखनकलाही माहिती नव्हती, तेव्हापासून साहित्यनिर्मिती अखंडितपणे घडत आहे आणि घडत राहील, असा विश्वास प्रसिद्ध लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी येथे व्यक्त केला.
साहित्यिक - कलावंत प्रतिष्ठान आयोजित तेराव्या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ. मुं. शिंदे, जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, चित्रकार सुहास बहुलकर, हिंदकेसरी अमोल बराटे, आमदार चंद्रकांत मोकाटे आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. संमेलनानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद््घाटन फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते, तर संमेलनाचे उद््घाटन जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. शिंदे
यांनी आपल्या मनोगतात यशवंतराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख आदी
राजकीय नेत्यांच्या कलाप्रेमाच्या आठवणी जागवल्या. अध्यक्षीय भाषणात डॉ. धोंगडे पुढे म्हणाल्या, साहित्य माणसाला वैचारिकदृष्ट्या कृतीशील बनवते. डोळसपणे वावरायला शिकवते आणि आपल्या संवेदनांची टोके धारदार बनवते. यामुळेच श्रेष्ठ साहित्य जाती,धर्म, भाषा, काल, देशाच्या मर्यादा ओलांडून अखिल मानवजातीला कवेत घेते आणि माणूस हाच त्याचा केंद्रबिंदू असतो.
‘जादूटोणाविरोधी विधेयकाचे राजकारण नको’
साहित्यिक-कलावंत प्रतिष्ठान आयोजित साहित्य संमेलनात उद््घाटन म्हणून
बोलताना जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे म्हणाले, ज्या कारणासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी प्राण वेचले, त्या जादूटोणाविरोधी कायदा प्रक्रियेत राजकारण आणणे चुकीचे होते. दाभोलकरांनी या एका गोष्टीसाठी जिवाचे रान केले. दीर्घकाळ सनदशीर मार्गाने लढा
दिला. समाजातील चुकीच्या प्रथांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बलिदानानंतर हा कायदा झाला याचे दु:ख वाटते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
फ. मुं. ची फटकेबाजी
रसिकांचे लाडके कवी फ. मुं. शिंदे यांनी आपल्या चिरपरिचित शैलीत, उपरोधिक भाषेत आपले मनोगत राजकारणी मंडळींचे किस्से ऐकवत रंगवले. कवीचा कोणताच पक्ष नसतो, असलाच तर तो रयतेचा पक्ष असतो. पण राजकारणी मंडळींमुळे रयतेचा पक्षाघात होऊ नये म्हणून कवीला जागरूक राहावे लागते, असे सांगून फमुंनी यशवंतराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख आदी मंडळींच्या काही आठवणी जागवल्या. स्वातंत्र्यानंतर 60 वर्षे उलटूनही सामान्य माणूस सुखी नसेल तर स्वराज्य नेमके कशाला म्हणायचे, असा सवाल फमुंनी केला. महाराष्ट्रात सुरुवातीपासून सुसंस्कृत राजकीय नेतृत्व असूनही असे व्हावे याची खंत वाटते, असे ते म्हणाले.