आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: वारकर्‍यांच्या सेवेत पुणेकर दंग, वैष्णवांच्या मेळ्याची हरतर्‍हेने सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पंढरीला निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्याची हरतर्‍हेने सेवा करण्यात रविवारी पुणेकर दंग होते. वारकर्‍यांना वैद्यकीय उपचार देण्यापासून ते चप्पल दुरुस्त करण्यापर्यंत विविध प्रकारांनी पुणेकरांनी त्यांच्याप्रती जिव्हाळा व्यक्त केला.

शनिवारी तुकोबा आणि माउलींच्या पालख्या पुण्यनगरीत दाखल झाल्या. त्या क्षणापासून वारकर्‍यांना सुविधा देण्यासाठी पुणेकर झटत आहेत. प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून अनेक खासगी-स्वयंसेवी संस्था, सहकारी निवासी सोसायट्या, तसेच वैयक्तिक पातळीवरही मदतीचे असंख्य हात सेवेसाठी पुढे आले आहेत. वारकर्‍यांना निवास, भोजन, स्वच्छता, आरोग्य, संपर्क अशा सार्‍या सेवा मिळाव्यात, असा प्रयत्न सुरू आहे. ठिकठिकाणी अन्नछत्रे, फळवाटप, मिठाई वाटप केंद्रे सुरू आहेत. पाण्याचे टॅँकर उपलब्ध केले आहेत. अगदी वारकर्‍यांना हजामतीपासून ते चप्पल दुरुस्तीपर्यंतच्या सेवा मोफत दिल्या जात आहेत. रविवारी दिवसभर पालख्यांच्या दर्शनासाठी रीघ लागली होती. वारकरीही दिवसभर शहरातील प्रेक्षणीय स्थळे, मंदिरे, बागा अशी ठिकाणे फिरत आहेत. काही जणांनी मोबाइलची कव्हर्स, रिचार्जिंग यासाठीही रांगा लावल्या आहेत. काही जुने दिंडीकरी मात्र पारंपरिक खेळ, अभंग, भजने गाण्यात विश्रांती
सार्थकी लावत आहेत.

पुढचा मुक्काम सासवड
पालख्यांचा पुढचा मुक्काम सासवडचा आहे. त्याआधी दिवेघाटाची अवघड चढण आणि तब्बल 27 किलोमीटरचा सर्वात मोठा टप्पा पार करायचा असल्याने ज्येष्ठ वारकर्‍यांनी विश्रांतीला प्राधान्य दिले आहे. महिला वारकरी तुळशीबागेच्या फेर्‍या करत आहेत.