आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saint Tukaram News In Marathi, Dehu, Divya Marathi

देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्याचा उत्साह!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भाविकांच्या अभंगगजरात मंगळवारी देहूनगरी दुमदुमली. शेकडो भजनी दिंड्यांनी रात्रभर केलेला जागर, काकडआरती, महापूजा, हरिपाठ अन् वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्यांची साथ अशा भक्तिमय वातावरणात बीज सोहळा संपन्न झाला.संत तुकोबांच्या 366 व्या बीज सोहळ्यासाठी लाखो भाविक देहूमध्ये दाखल झाले होते. पहाटे चारपासून मुख्य देऊळवाड्यात व मंदिरात काकडआरती, महापूजा, महानैवेद्य असे धार्मिक विधी झाले. देवस्थान अध्यक्ष रामदास मोरे, विश्वस्त सुनील मोरे, जालिंदर मोरे, अशोक मोरे, अभिजित मोरे, सरपंच कांतीलाल काळोखे आदींच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, गोपाळपुरा, शिळा मंदिर येथे पूजा झाल्या. त्यानंतर टाळकरी, सनई, चौघडे, शिंगवाले, ताशे, नगारे, अब्दागिरी, जरीपटके अशा लवाजम्यासोबत पालखी सोहळा मंदिरातून वैकुंठगमन मंदिराकडे मार्गस्थ झाला. नांदुरकी वृक्षापाशी तुकोबांच्या वंशातील बापू महाराज मोरे देहूकर यांचे पारंपरिक अभंग कीर्तन झाले. ठीक बारा वाजता तुकोबांच्या नामाचा गजर करत भाविकांनी नांदुरकी वृक्षावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर पालखी पुन्हा मंदिराकडे निघाली. दर्शनबारी दिवसभर सुरू होती. पाटबंधारे विभागाने इंद्रायणीत भरपूर पाणी सोडल्याने भाविकांची सोय झाली. चोख पोलिस बंदोबस्तही तैनात होता.


मुंडे बनले वारकरी
बीज सोहळ्यासाठी राजकीय नेत्यांचीही आवर्जून हजेरी होती. त्यामध्ये भाजपचे गोपीनाथ मुंडे, शिवसेनेचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे, आमदार विलास लांडे, बाळा भेगडे यांचा समावेश होता. मुंडे दुपारी बाराच्या सुमारास देहूमध्ये आले. त्यांनी वारक-यांच्या वेशातच दर्शन घेतले. वारक-यांसमवेत फुगडीही घातली.