आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samridh Jeevan Chit Funds' Scam, Mahesh Motewar Admit In Sasoon Hospital

महेश मोतेवार ससूनमध्ये दाखल, छातीत दुखत असल्याची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेश मोतेवार (फाईल फोटो) - Divya Marathi
महेश मोतेवार (फाईल फोटो)
पुणे- समृद्ध जीवन अॅंड फूड्स कंपनीच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले कंपनीचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांना काल रात्री सोलापूरहून पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर उमरगा येथील तुरुंगातून मोतेवार यांना प्रथम सोलापूरला आणण्यात आले. सोलापूरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर काल सायंकाळी पुण्यात आणण्यात आले.
गुरुवारी रात्री उशिरा मोतेवार यांना पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. मोतेवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, आपल्या छातीत दुखत असल्याचे मोतेवार हे डॉक्टरांना सांगत आहेत. दरम्यान, मोतेवार यांची पोलिस कोठडी आज संपली असून, कोर्टाने मोतेवार यांचा वैद्यकीय अहवाल मागवला आहे. मोतेवार यांच्या तब्बतेची तासा-तासाला अपडेट कोर्टाला कळवा असा आदेश कोर्टाने ससून रूग्णालयाला दिला आहे. त्यानुसार ससून रूग्णालयातील डॉक्टर कोर्टाला मोतेवार यांचा वैद्यकीय अहवाल एक-एक तासाला देत आहेत.
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी महेश मोतेवार यांना सोमवारी (28 डिसेंबर) उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यात अटक केली होती. त्यानंतर त्यांना उस्मानाबाद येथे नेण्यात आले. कोर्टात हजर केल्यानंतर मोतेवार यांना 31 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज पोलिस कोठडी संपली असून, त्यांना कोर्टात हजर करणे अपेक्षित होते. मात्र, तुरुंगातच तब्बेत बिघडल्याने त्यांना प्रथम सोलापूरला व नंतर पुण्यातील रूग्णालयात दाखल केले आहे.

महेश मोतेवार यांना अटक केल्यानंतर सीबीआयने मंगळवारी समृद्ध जीवनशी संबंधित कार्यालये, बॅंक, संचालकांची निवासस्थाने अशा 58 ठिकाणी छापे टाकले होते. पुण्यातील 40 ठिकाणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर येथील प्रत्येकी एक तर ओडिशात दोन कार्यालयांवर छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. चिटफंड घोटाळ्यात समृद्ध जीवन कंपनीच्या विरोधात सीबीआय तपास करत आहे. अधिकृतरीत्या कोणतीही परवानगी न घेता सामान्य नागरिकांकडून गुंतवणुकीकरिता चिटफंडच्या माध्यमातून पैसे गोळा केल्याचा समृद्ध जीवनवर आरोप आहे.