आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेफाम तस्कर : तहसीलदारांच्या चालकाचा खून, दाेघांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - मद्यधुंद वाळू तस्करांच्या भरधाव कारने दुचाकीवर असलेल्या तहसीलदारांच्या वाहनचालकाला जाेराची धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या अनिल जयसिंग काळे या वाहनचालकाचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहराजवळ गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. दरम्यान, पाेलिसांनी आराेपींच्या वाहनाचा पाठलाग करून दाेघांना अटक केली असून त्यांच्यावर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य सरकारने वाळू तस्करांवर ‘मकाेका’ कायद्यानुसार कारवाईचा आदेश काढल्यामुळे महसूल प्रशासनानेही धडक कारवाई सुरू केली आहे. त्यातच उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने तेथून बेकायदा वाळू उपसा करून ताे पळवण्याची जणू स्पर्धाच वाळू माफियांमध्ये लागली आहे. गेल्या काही दिवसांत महसूल प्रशासनानेही या तस्करांवर कठाेर कारवाईचे अस्त्र उगारले आहे. बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांच्या सहा बाेटी स्फाेटकांनी उडवून देण्याची घटना साेलापूर जिल्ह्यात घडली हाेती. त्यावरून वाळू माफिया व प्रशासनात संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.

अज्ञात व्यक्तीचा फाेन आल्यामुळे अनिल काळे हे गुरुवारी सायंकाळी इंदापूर शहराजवळ डोंगराई ढाब्याजवळ दुचाकीवरून गेले हाेते. त्याच ठिकाणी दारूच्या नशेत असलेला सचिन पांडुरंग माने व नवनाथ किसन एकांड (रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर) या दाेघांनी भरधाव तवेरा गाडी चालवून काळेंच्या दुचाकीला धडक दिली, यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे काळेंना तातडीने अकलूजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्याेत मालवली. दरम्यान, काळेंना धडक दिल्यानंतर कार दामटून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या माने व एकांड या दाेघांना पाेलिसांनी पाठलाग करून पकडले. या आराेपींवर खुनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेहाला हात लावणार नाही, असा पवित्रा काळेंच्या कुटुंबीयांनी घेतला, त्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली हाेती. त्यामुळे वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी या दाेन्ही आराेपींविराेधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

कायद्याचा धाक नाही : सहा महिन्यांपूर्वीच इंदापूर तालुक्यातील भिगवण गावाजवळ वाळू ठेक्याच्या वादातून दाेघांवर गाेळीबार झाला हाेता. यात विनोद बंडगर या तरुणाचा मृत्यू झाला हाेता, तर इंदापूरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या गाडीला ठाेकर मारण्यापर्यंत वाळू तस्करांची मजल गेली हाेती. तसेच काही महिन्यांपूर्वी बारामती तालुक्यात निरा नदीवरील पाण्याने भरलेला बंधाराच वाळू चोरांनी उडवला हाेता. तसेच साेलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रकारही घडला हाेता. सरकारने वाळू तस्करांवर ‘मकाेका’नुसार कारवाईचा आदेश काढला आहे. मात्र, तस्कर त्यालाही जुमानत नसल्याचेच दिसून येते.

पाेलिसांची तत्परता
पुणे-साेलापूर महामार्गावरून एक वरिष्ठ अधिकारी दाैऱ्यावर येणार असल्याने डाेंगराई ढाब्याजवळ दाेन पाेलिस शिपाई तैनात हाेते. त्यांच्यासमाेरच वाळू तस्करांनी काळेंच्या गाडीला धडक देऊन पळ काढला. मात्र, पाेलिसांनी तत्परता दाखवत आपल्या दुचाकीवरून कारचा पाठलाग करून दाेन्ही आराेपींना जेरबंद केले.

फोन करून खून..
गुरुवारी संध्याकाळी अनिल काळे हे घरी आले हाेते. मात्र, तेवढ्यात त्यांना काेणाचा तरी फाेन आला. त्यामुळे ‘पंधरा मिनिटांतच परत येतो,’ असे सांगून ते बाहेर पडले. मात्र, काही वेळातच त्यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळाली. फाेन करून बाेलावून घेऊन खून करण्यात आला आहे. - सुरेखा काळे, मृत अनिल यांची पत्नी

तहसीलदारांना धमकी
दाेन्ही आराेपींना इंदापूर पाेलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यावर एका आराेपीचा भाऊ शिवाजी किसन एकांड याने तिथे येऊन तहसीलदार सूर्यकांत येवले यांना धमकी दिली. ‘कोण गुन्हा दाखल करतो तेच पाहतो,’ अशा धमक्या पाेलिसांनाही दिल्या. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.