बारामती - उजनी धरण क्षेत्रात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या १५ बाेटी प्रशासनाने मंगळवारी जिलेयिन स्फाेटाने उडवून दिल्या. त्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले अाहे. वाळूच्या धंद्यातील मुजाेरी माेडून काढण्यासाठी महसूल प्रशासनाकडून सातत्याने अशी कारवाई सुरू राहील, असा इशारा बारामतीचे प्रांताधिकारी संताेष जाधव यांनी दिला अाहे.
पुणे व साेलापूर जिल्ह्याच्या सीमेवर वाळू तस्करांनी गेल्या काही महिन्यांपासून उच्छाद मांडला अाहे. वाळू माफियांविराेधात मकाेकानुसार कारवाई करण्याचा कायदा करूनही या तस्करांवर त्याचा काही एक परिणाम जाणवत नाही. काही दिवसांपूर्वीच इंदापूर तहसीलदारांच्या वाहनचालकाचा भरधाव गाडीने उडवून खून करण्यात अाला हाेता. या हत्येमागेही वाळू तस्करांचाच हात हाेता. तसेच साेलापूरचे तहसीलदार तुकाराम मुंडे यांचे वाहन ठाेकरण्याचे धाडसही तस्करांकडून झाले हाेते. मात्र, अाता महसूल प्रशासनाने या माफियांविराेधात जाेरदार माेहीम उघडली अाहे.
दरम्यान, दुष्काळामुळे उजनी धरणक्षेत्र कोरडे पडले आहे. या संधीचा फायदा घेऊन वाळू माफियांनी दाेन महिन्यांपासून बेकायदा अमाप वाळू उपसा सुरू केला अाहे. मात्र, मंगळवारी महसूलच्या पथकाने असा वाळू उपसा करणाऱ्या सुमारे १५ बाेटी जिलेटिन स्फाेटाच्या साह्याने उडवून दिल्या. तसेच चार जणांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात अाले अाहे.
पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यात पसरलेल्या उजनी धरण क्षेत्रात शेजारी जिल्ह्यातील माफियांच्या मदतीने वाळूचा सर्रास उपसा केला जाताे. त्यामुळे मंगळवारी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर व दौंड तालुक्याच्या महसूल पथकाने संयुक्त कारवाई केली. सर्वच बाजूंनी नाकेबंदी झाल्याने वाळूमाफियांना पळता भुई थाेडी झाली हाेती.