आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangali Voter Name In Pune List News In Divya Marathi

सांगलीचे एक लाख मतदार पुण्याच्या यादीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सांगली लोकसभा मतदारसंघातील तब्बल 1 लाख 8 हजार मतदारांची नावे पुणे लोकसभा मतदारसंघात घुसवल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला. सरकारी अधिकार्‍यांच्या संगनमताने मतदारांची घुसखोरी झाली असून यामागे काँग्रेस असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, काँग्रेसने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे याबाबची तक्रार शुक्रवारी देण्यात आली. मतदारांच्या घुसखोरीस जबाबदार सरकारी अधिकार्‍यांवर कडक कारवाई करावी तसेच दुबार नोंदणी केलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. या विषयाचे गांभीर्य पाहून 13 तारखेला राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडेही तक्रार देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

फॉर्म भरून एकाच वेळी दोन ठिकाणच्या मतदारयादीत नावनोंदणी करणे गुन्हा आहे. सरकारी अधिकार्‍यांच्या संगनमताशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांची दुबार नोंद होऊ शकत नाही. या दुबार मतदारांची नावे काढून टाकावीत. पुण्याची मतदार यादीची पुन्हा छाननी केल्याशिवाय मतदान घेऊ नये, अशी भाजपची मागणी आहे.

संशयाची सुई कदमांकडे
ज्येष्ठ काँग्रेस मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजित कदम यांना काँग्रेसने पुण्यातून उमेदवारी दिली आहे. पतंगराव सांगलीचेही पालकमत्री आहेत. भारती विद्यापीठ या पतंगरावांच्या खासगी शैक्षणिक संस्थेसह अनेक सहकारी संस्थांचे जाळे त्यांनी सांगली व पुण्यात विस्तारले आहे. या संस्थांशी संबंधित लोकांची नावे सांगली आणि पुणे या दोन्ही ठिकाणी नोंदवण्यात आल्याचा आरोप भाजपकडून होतोय.

अशी झाली घुसखोरी
सांगलीतील 1 लाख 8 हजार मतदारांची नावे अतिशय नियोजनबद्धरीत्या घुसवण्यात आली आहेत. पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी साडेसतरा हजार मतदारांची नावे नोंदवली गेली आहेत.

संशय कसा आला?
दोन्ही मतदारसंघांत एकाच नावाची 1 लाख 8 हजार नावे आढळली. ही सर्व मतदार नोंदणी गेल्या 4-6 महिन्यांतील असून त्यांची नावे एकच असली तरी फोटो वेगळे आहेत. नवे मतदार म्हणून नोंद झालेल्या सर्व मतदारांचा वयोगट 30 ते 58 आहे. पहिल्यांदाच नोंद करणारे तरुण मतदार 18 ते 25 वयोगटातील असतात. महत्त्वाचे म्हणजे सर्व 1 लाख 8 हजार मतदार सिंगल आहेत.