पुणे-मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाच्या वेळी बेकायदा एके-47 रायफल बाळगल्याप्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला व सध्या ‘पॅरोल’वर बाहेर असलेला अभिनेता संजय दत्तला आणखी 30 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आली आहे. पत्नी मान्यतावर उपचारांच्या कारणासाठी त्याला पाचव्यांदा ही रजा मंजूर करण्यात आली, हे विशेष.
संजयला या प्रकरणात साडेपाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. यापूर्वी त्याने 18 महिन्यांची शिक्षा भोगली होती. दरम्यान, 21 मे 2013 रोजी संजय दत्त पोलिसांना शरण आला होता. त्याला पुण्याच्या येरवडा कारागृहात डांबण्यात आले होते. केवळ साडेचार महिने शिक्षा भोगल्यानंतर विविध कारणांनी मागील 8 महिन्यांत 5 वेळा त्याला संचित रजा मंजूर करण्यात आली आहे. पत्नी मान्यता आजारी असून तिच्यावर उपचार करण्याच्या कारणावरून पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी संजयला मंगळवारी पाचव्यांदा 30 दिवसांची संचित रजा मंजूर केली. आता 21 मार्च रोजीच मुन्नाभाई येरवड्यात परतणार आहे.
‘रजा’कार संजूबाबा
21 मे 2013 : संजय दत्त येरवड्यात
1 ऑक्टोबर 2013 : 14 दिवसांची रजा (फर्लो)
14 ऑक्टोबर 2013 : 14 दिवसांची वाढ
21 डिसेंबर 2013: 1 महिन्याची सुटी
20 जानेवारी 2014 : महिनाभराची वाढीव सुटी
18 फेब्रुवारी 2014 : पॅरोलमध्ये 30 दिवसांची वाढ
संजय दत्त बहिणीचा प्रचारही करेल : तावडे
कोल्हापूर- आज पत्नीचे आजारपण, उद्या घरातील सण-समारंभ, परवा सरकारच्या कृपाशीर्वादाने संजय दत्त बहिणीचा लोकसभेचा प्रचार करतानाही दिसेल,’ अशा भाषेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी संजय दत्तच्या पॅरोलप्रकरणी टोले लगावले. कोल्हापूर येथील टोलविरोधी मोर्चासाठी आलेल्या तावडे यांनी या वेळी शासनावर टीका केली. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबतचा नारायण राणे समितीचा अहवाल शासनाने तातडीने खुला करा.