आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबू सलेमवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संजय दत्तच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्यावर तळोजा तुरुंगात काल (गुरुवारी) रात्री गोळीबार झाला. त्याच्या खांद्याला गोळी लागल्याने तो थोडक्यात बचावला. परंतु या घटनेच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्याही सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्‍यात आली आहे. संजय दत्त सध्या पु्ण्यातील येरवडा तुरुंगात आहे.

संजयला आठ बाय दहाच्या बॅरेकमध्ये हलवण्यात आले असून त्याच्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. संजयला बॅरेकबाहेर निघण्यास बंदी घालण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाने घेतला आहे. एवढेच नव्हे तर आता संजयचे जेवणही त्यांच्या बॅरेकमध्येच पाठवले जाणार आहे.

अबू सालेम यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी तळोजा तुंरूगातील एक अधिकारी आणि तीन पोलिस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्यात 'तळोजा'चे तुरुंगाधिकारी संजय साबळे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाठारे, नितीन सावंत आणि गितेश रणदिवे यांचा समावेश आहे. अशी माहिती राज्याच्या तुरंग विभागाच्या अतिरिक्त महासंचालक मीरा बोरवणकर यांनी दिली.

दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्यावर तळोजा तुरुंगात काल (गुरुवारी) रात्री गोळीबार करण्यात आला होता. त्यात अबूच्या खांद्या जबर दुखापत झाली होती. त्याला तत्काळ त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अबूवर उपचार सुरु आहेत. अ‍ॅड. शाहीद आझमी खून प्रकरणातील आरोपी देवेंद्र जगताप याने हा गोळीबार केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

नोव्हेंबर 2005 मध्ये सालेमला त्याची गर्लफ्रेंड मोनिका बेदीसह पोर्तुगालमध्ये अटक झाली होती. त्यानंतर भारताशी असलेल्या प्रत्यार्पण करारानुसार पोर्तुगालने दोघांनाही भारताच्या हवाली केले. तेव्हापासून सालेम तुरुंगात आहे. यापूर्वी दाऊद टोळीचा गुंड मुस्तफा डोसा याने 24 जुलै 2010 रोजी ऑर्थर रोड तुरुंगात सालेमवर चमच्याने हल्ला
केला तेव्हा त्याच्या चेहर्‍याला दुखापत झाली होती. त्यानंतर सालेमला तळोजा तुरुंगात हलवण्यात आले. हल्लेखोर जगताप याच्यासोबत संतोष शेट्टी या गुंडाचेही नाव समोर येत असून तुरुंगात ही शस्त्रे कशी पोहोचली, याचा पोलिस तपास करत आहेत.