पुणे- संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी अलंकापुरीत राज्यभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. आज पहाटे मुख्य महापूजा झाली. यंदा माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचे 722 वे वर्ष आहे. अलंकापुरीत दाखल होणाऱ्या लक्षावधी भाविकांची सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी आळंदीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शनिवारपासून दिंड्या आळंदीत दाखल झाल्या आहेत. कार्तिकी एकादशीला माउलींच्या समाधीचे दर्शन घेण्याची उत्कंठा भक्तजनांच्या मनात दाटली आहे. आळंदीतील इंद्रायणीचा काठ भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. राज्याच्या विविध भागांतून दिंड्या दाखल होत आहेत. आळंदीत प्रवेश करताच, प्रथम प्रदक्षिणा पूर्ण करण्याची पद्धत आहे. त्यानंतरच पालख्या, दिंड्या विसावतात. विसावा झाल्यावर भाविकांची दर्शनबारीत उभे राहण्यासाठी लगबग सुरू आहे.
समाधीच्या दर्शनाची साऱ्यांना आस लागली आहे. त्यामुळे पाच-सहा तास दर्शनबारीत उभे राहूनही भाविकांच्या मुखी असणारा माउलींच्या नामाचा गजर अखंडितपणे सुरू आहे. टाळ-मृदंगाच्या गजराने इंद्रायणीचा काठ दुमूदमत आहे. वीणामंडपात महिलांच्या फुगड्या, फेर, भारुडे सादर होत आहेत.
सोहळा आठवडाभर सुरू राहणार -
- माउलींचा संजीवन समाधी सोहळा आठवडाभर सुरू राहणार आहे. मुख्य संजीवन समाधी सोहळा १६ नोव्हेंबरला आहे. पहाटे दोनपासून पवमान अभिषेक, दुधारती, महापूजा, दिंडी प्रदक्षिणा, घंटानाद, महाप्रसाद नैवेद्य, पुष्पवृष्टी, धूपारती, जागर असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन नामदास महाराज करणार आहेत. या सोहळ्यासाठी देवस्थान, नगरपालिका प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज आहे.