आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरिनामाचा गजर : भक्तिरसात न्हात वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ऊन-सावल्यांचा  रंगलेला खेळ आणि लक्षलक्ष पावलांनी ‘जय जय रामकृष्णहरी’ असा घोष करत साधलेला मेळ..ध्वज, भगव्या पताका, तुळशीवृंदावने, गळ्यात अडकवलेले  टाळ आणि वीणा..लक्ष कंठातून एकाचवेळी उठणारा हरिनामाचा गजर..आणि पालख्यांच्या  दर्शनासाठी  भाविकांची उपस्थिती..अशा भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम
महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे रविवारी सायंकाळी पुण्यनगरीत आगमन झाले.   
 
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पालख्यांचे स्वागत केले. तसेच दिंडीच्या मानकऱ्यांचा सत्कार केला.   टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी, पंढरीची..असा पुकारा करत मराठी संस्कृतीचे आणि लोकजीवनाचे प्रतीक मानला जाणारा वारीचा मेळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यात विसावला. माउलींच्या  पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील मंदिरात तर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील मंदिरात आहे. आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड हे वारीमार्गावरील सर्वाधिक वाटचालीचे टप्पे असल्याने पुण्यात दोन मुक्काम केले जातात. मंगळवारी सकाळी दोन्ही पालख्या पुण्यातून हडपसरमार्गे प्रयाण करणार आहेत. पुणे-मुंबई महामार्गावरून आकुर्डी येथून सकाळी निघालेला तुकोबांचा पालखी सोहळा सायंकाळी सहाच्या सुमारास पुण्यात प्रथम दाखल झाला. मानाच्या दिंड्या, सजवलेला रथ, पादुकांच्या दर्शनासाठी उडालेली झुंबड, असे दृश्य ठिकठिकाणी पहायला मिळत होते.
 
विठ्ठल-रखुमाईचे मंदिर रोषणाईने झळाळले 
 पंढरपूर - आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणारे श्री विठ्ठल - रखुमाईच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे. आषाढी यात्रेत दरवर्षी मंदिर रंगीबेरंगी विद्युत दिव्यांनी झगमगून टाकण्यात येते. पुण्याच्या विनोद जाधव व नीलेश जावध यांच्या शिवदत्त डेकोरेशन यांनी ही सेवा मोफत पुरवली आहे.
 
रंगावलीच्या पायघड्या   
समर्थ रंगावली ग्रुपच्या वतीने संपूर्ण पालखी मार्गावर मुख्य चौक, स्वागतकक्ष, विसाव्याची ठिकाणे येथे आकर्षक रंगावली पायघड्या रेखाटण्यात आल्या होत्या. पुढील वारीमार्गावरही अशाच प्रकारे रंगावलीच्या पायघड्या रेखाटल्या जाणार आहेत. त्यासाठी संस्थेचे ३० हून अधिक कार्यकर्ते सातत्याने रंगावली करत आहेत.   
 
गर्दीचे प्रमाण कमी
रविवारची सुटी, भारत-पाकिस्तान क्रिकेट आणि हॉकीचे अंतिम सामने हे एकत्र आल्याने यावर्षी पालख्यांच्या आगमनाप्रसंगी नेहमी दिसणाऱ्या गर्दीत मात्र यंदा घट झाल्याचे जाणवले. अन्यथा संपूर्ण रस्त्यावर पालख्या मुक्कामस्थानी पोहाेचेपर्यंत दुतर्फा भाविकांची प्रचंड गर्दी असते. यंदा ती कमी झाली आहे.   
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा फोटो...
बातम्या आणखी आहेत...