पुणे - भगव्यापताका, ध्वज, तुळशी वृंदावने, तुळशीमाळा, गंधबुक्का धारण केलेल्या लक्षावधी माउलीभक्तांची जोड घेत सायंकाळी पाचच्या सुमारास आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. माउलींच्या पालखी सोहळ्यात सुमारे चारशे दिंड्यांचा समावेश आहे.
पालखीपुढे २७ तर मागे २० अशा मुख्य ४७ दिंड्यांना दर्शनासाठी प्राधान्यक्रम होता. त्यानंतर अन्य दिंड्या सोडण्यात आल्या. प्रस्थानाच्या पहिल्या दिवशी माउलींच्या पालखीचा मुक्काम आळंदी येथेच आजोळघरी असतो. नगर प्रदक्षिणा करून पालखी पहिल्या मुक्कामासाठी आजोळघरी नेण्यात आली. रविवारी सकाळी माउलींचा पालखी सोहळा पुण्याकडे मार्गक्रमण करेल.
पालखी सोहळयाची माहिती अॅपवर : तुकोबा,माउलींच्या पालखी देहू, अाळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले अाहे. दोन्ही पालख्यांसोबत सुमारे तीन-चार लाखाहून अधिक वारकरी असतात. अडीचशेहून अधिक दिंड्या असतात. राज्यातीलच नव्हेतर कर्नाटक, अांध्र प्रदेशातून अनेक वारकरी येतात. पालखी सोहळ्यातील अपडेट (नियमित माहिती) वारकऱ्यांना तसेच नागरिकांनाही एका क्लिकवर घरबसल्या मिळणार अाहे. माउलींच्या पालखीने शनिवारी आळंदीतून प्रस्थान केले.