आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात पंढरपूराकडे प्रस्थान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आळंदी(पुणे) - भक्तिरसाने चिंब झालेले वारकरी... टाळ-मृदंगाचा गजर... फडफडणाऱ्या भगव्या पताका अन्‌ माउली- माउली नामाचा जयघोष... अशा चैतन्यमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पंढरीपूराकडे प्रस्थान केले. माझे जिवाची आवडी, पंढरपुरा नेईल गुढी‘ या अभंगाच्या ओळी सार्थ ठरवीत लाखो भाविकांनी कृतार्थतेची भावना अनुभवली. पहाटेपासूनच वैष्णवांचा मेळावा इंद्रायणीकाठी जमला होता. भाविकांच्या गर्दीने आज आळंदी दुमदुमून गेली होती. इंद्रायणीच्या दोन्ही तीरांवर भक्तीचा हल्लोळ झाला होता.
माउलींच्या सहवासाची आणि विठुरायाच्या भक्तीची आस बाळगून राज्याच्या कानाकोपऱ्यातून नव्हे; तर अन्य राज्यांतून लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले होते. माउलींच्या पालखीचा देखणा प्रस्थान सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी प्रत्येकाची धडपड होती. पहाटेपासून देऊळवाडा जागा होता. घंटानाद, काकडा, पवमान, अभिषेक, पंचामृतपूजा आणि दुधारती या नैमित्तिक कार्यक्रमानंतर प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू झाली.
प्रस्थान सोहळ्यासाठी दुपारी तीनच्या सुमारास दर्शनबारी बंद करण्यात आली होती. पुजाऱ्यांनी माउलींच्या समाधीवर मुखवटा ठेवून गळ्यात तुळशीहार, गुलाबपुष्पांचा हार घालून डोक्‍यावर चांदीचा मुकुट ठेवला. सजविलेले हे माउलींचे रूप साऱ्यांनाच भावत होते. आळंदी ग्रामस्थांनी, व्यापाऱ्यांनी पालखी फुलांनी सजविली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने रथापुढील काही दिंड्या आणि रथामागील काही दिंड्या मंदिरात सोडल्या. त्यानंतर प्रस्थान सोहळ्यास सुरवात झाली. सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.