आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत तुकोबारायांची गाथा महागली !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा आजवर सर्वसामान्य भाविकांना नाममात्र किमतीत उपलब्ध होती. मात्र, यंदापासून भाविकांना पन्नास रुपयांऐवजी शंभर किंमत मोजावी लागणार आहे. शासकीय अनुदान योजनेतून मिळालेला निधी योग्य प्रकारे न हाताळल्याने देहू संस्थानवर किंमत वाढवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
तुकोबांच्या गाथेचे माहात्म्य आजही कायम आहे. अगदी ब्रिटिश काळातही 1869 मध्ये 24 हजार रुपये अनुदान देऊन गाथेची छपाई केल्याची नोंद सापडते. या पार्श्वभूमीवर 1999 मध्ये तुकोबांच्या त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्ताने तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी पाच लाख रुपयांचा निधी फक्त गाथेच्या प्रती छापण्यासाठी संस्थानला उपलब्ध करून दिला होता. त्या रकमेच्या व्याजातून स्वस्त व सुबोध गाथाप्रतींची छपाई केली जात होती.
दरम्यानच्या काळात समाजातील काही लब्धप्रतिष्ठितांनी आणि पुढारी मंडळींनी या स्वस्त गाथांची मोठ्या प्रमाणात खरेदी करून गाथाछपाईचे गणित बिघडवले. परिणामी त्याच्या प्रती सामान्य भाविकांना उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे मागणी अधिक आणि पुरवठा मोजका, अशी परिस्थिती निर्माण झाली. शिवाय दरम्यानच्या काळात छपाई, कागदाच्या किमती व अन्य खर्चही वाढले आणि गाथेची किंमत दुप्पट करण्याशिवाय संस्थानच्या विश्वस्तांसमोर मार्ग उरला नाही. त्यामुळे यंदापासून गाथेसाठी दुप्पट किंमत मोजावे लागणार आहे.
व्याजावरच छपाई
शासकीय अनुदानाचे व्याज, अन्य निधी यावरच गाथेची छपाई आजवर केली जात आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सर्वच खर्च वाढला असल्याने गाथेची किंमत वाढवावी लागणार असल्याचे देहू संस्थानचे विश्वस्त अशोक मोरे यांनी सांगितले.
पालखी प्रस्थान 18 ला
यंदाचा आषाढीचा सोहळा 18 जून (देहू) आणि 20 जून (आळंदी) या तारखांपासून सुरू होणार आहे, अशी माहिती दोन्ही संस्थानच्या विश्वस्तांनी दिली. पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा पार पाडला जाईल, असे ते म्हणाले.