आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मठेपेची शिक्षा भोगताना मिळवल्या ११ पदव्या,लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - वाईट मित्रमंडळींच्या सहवासामुळे अवघ्या १९ वर्षांच्या वयात एका महाविद्यालयीन तरुणाकडून किरकोळ भांडणातून मित्राचा खून झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला जन्मठेपची शिक्षा सुनावली. मात्र, त्यानंतर जराही न डगमगता त्याने शिक्षा भोगत असताना शिक्षणाला प्राधान्य देण्याचे ठरवले. कारागृहातील विविध समस्यांवर मात करत त्याने १६ वर्ष शिक्षा भोगत तब्बल ११ शैक्षणिक पदव्या मिळवल्या, आणि त्याचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. कारागृहातील चांगल्या वागणुकीमुळे तसेच शिक्षेची पूर्तता झाल्याने अखेर एक दिवस तो तुरुंगाबाहेर आला आणि त्याने सुखी संसाराची वाट धरली.

एखाद्या चित्रपटाची कथा ज्याप्रमाणे घडते. तशाच प्रकारची वेगवेगळी िस्थत्यंतरे पार करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे संतोष अर्जुन शिंदे. ८ फेब्रुवारी १९९३ हा दिवस संतोषच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. १२ वी मध्ये शिक्षण घेत असताना मित्रासोबत झालेल्या वादातून त्याने मित्राचा खून केला. याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. कारागृहात शिक्षा भोगत असताना ठरावीक कामे केल्यानंतर मोकळा वेळ मिळत असल्याने काय करावे, असा विचार त्याच्या मनात आला. इतर कैदी मोकळा वेळ घालवण्यासाठी गांजा, सिगारेट पिणे, जुगार खेळणे किंवा मनाेरंजनाचे इतर उद्योग करत असत.

मात्र, संतोषने रिकामा वेळ अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी सार्थकी लावण्याचे ठरवले. पुढे शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्याने पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, अहमदाबाद विद्यापीठ, ज्ञानप्रबाेधिनी, नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अशा वेगवेगळ्या विद्यापीठ व संस्थामधून बीए इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, सामाजिक शास्त्र, एमए हिंदी, सामाजिक शास्त्र, संगणकाच्या अभ्यासक्रमाच्या तीन पदवी, गांधी विचारांचा डिप्लाेमा अशा एकूण ११ पदवी, पदव्युत्तर आणि पदविका मिळवल्या. लिम्का बुक ऑफ रेकाॅर्डतर्फे कारागृहातील कैद्यांच्या शिक्षणाबाबतच्या सर्व्हेक्षणात संतोषने अर्ज भरून दिला आणि त्याची दखल घेत लिम्का बुक ऑफ रेकाॅर्डने त्याचे नाव कायमस्वरूपी नोंदवून घेतले आहे.
त्याच्या जिद्दीला सलामी
सदर गुन्ह्यात १९९३ मध्ये कारागृहात गेलेला संतोष अखेर २००९ मध्ये शिक्षा पूर्ण करून कारागृहाबाहेर आला. त्याने कारागृहात घेतलेल्या पदव्यांची दखल घेऊन एक तरुणी त्याला भेटली. बोलताना त्याचा तरुणीवर प्रभाव पडला. त्यानंतर दोघांनी लग्न केले असून त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. संतोष सध्या पुण्यातील एका बांधकाम कंपनीत काम करत असून नवजीवन संस्था आणि आदर्श मंडळाच्या माध्यमातून कैद्यांचे पुनर्वसन आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी जागृतीचे सामाजिक काम करत आहे.