आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ जणांचा बळी घेणारा एसटीचालक माने दोषी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बेदरकारपणे एसटी चालवून 9 जणांचा बळी घेतानाच 39 जणांना जखमी करणारा चालक संतोष माने यास अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवले. न्यायाधीश व्ही.के. शेवाळे यांनी हा निकाल दिला. खून, खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, शासकीय साधनांचा दुरुपयोग अशी कलमे मानेविरुद्ध लावण्यात आली आहेत. या प्रकरणी त्याला 8 एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
स्वारगेट डेपो नियंत्रकांनी चालकांचा तुटवडा असल्याने मानेला ड्यूटी बदलून दिली नव्हती. त्यामुळे 25 जानेवारी 2012 रोजी माने याने डेपोतील एसटी (एमएच 14 बीटी 1532) चोरून नेऊन रस्त्यावर धुमाकूळ घातला होता.

मानेला दोषी ठरवताना न्यायाधीश शेवाळे म्हणाले की, मानेची प्रकृती स्थिर होती. त्याला कोणताही मानसिक आजार नव्हता. आदल्या दिवशी त्याने गाणगापूरहून पुण्याला एसटी योग्य रीतीने आणली. घटनेच्या दिवशी वाहन चालवताना तो लोकांना मारत सुटला होता. कोणत्याही इमारतीला त्याने वाहन धडकवले नाही. या अर्थी तो सर्व गोष्टी जाणूनबुजून करत होता. अशा निर्घृण गुन्ह्यानंतर तो वेडा आहे, असे म्हणता येणार नाही. सोलापूरचे डॉ. दिलीप बुरूटे यांनी मानेवर उपचारासंबंधी न्यायालयात दाखल केलेली औषधोपचाराची कागदपत्रे बनावट आहेत. त्याला कोणतेही भास होत नसून, तो आजारीही नाही, असा अहवाल डॉक्टरांनी नंतर न्यायालयात सादर केला होता. एकंदर परिस्थितीजन्य पुरावे पाहता माने दोषी असल्याचे सिद्ध होते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
यावेळी सरकारी वकील उज्वला पवार व बचाव पक्षाचे वकील धनंजय माने न्यायालयात उपस्थित होते.
मानेची कौटुंबिक परिस्थिती
संतोष माने हा मुळचा सोलापूर येथील कवठाळी या गावचा रहिवासी आहे. त्याच्या वडीलांचा यापुर्वी मृत्य झाला असून आई शेती करते. त्याला दोन भाऊ असून शिवशंकर याचे फोटो स्टुडिओ असून जनक हा जीप वाहनचालक आहे. तो पत्नी राणी, मुलगी प्रियंका (वय-15), अदिती (4) व मुले आदित्य (14) व श्री (8) यांच्यासह सोलापूर येथे राहत होता. त्याने आतापर्यंत राज्य परिवहन मंडळात 18 वर्षे नोकरी केली आहे.

झालेले नुकसान भरुन येणार नाही
या घटनेत मृत्यमुखी पडलेले ह्यओह्ण हॉटेलचे कमर्चारी मिलिंद गायकवाड यांच्या पत्नी नंदिनी गायकवाड म्हणाल्या, आरोपीला कडक शिक्षा झाली तरच अशा प्रवृत्तीला जरब बसेल. माझे झालेले नुकसान भरुन न येणार आहे. आम्ही जे भोगले तसे पुन्हा घडू नये याकरिता शासनाने प्रयत्न केले पाहिजे.

मानेला घटनेचे गांभीर्य नाही
घटनेत मृत्यमुखी पडलेल्या श्वेता ओसवालचे पती धवल म्हणाले, माने याने या घटनेत इतक्या लोकांना मारले त्याबद्दल त्याला कोणतेही दु:ख नसून त्याला घटनेचे गांभीर्य नाही. तो मनातून मेला असून त्याला शिक्षेचे काही वाटत नाही. श्वेताच्या आठवणींची जपणूक करण्यासाठी श्वेता मेमोरिअल ट्रस्टची स्थापना करुन सामाजिक उपक्रम आम्ही राबवत आहे.

घटनेत मृत्यमुखी पडलेल्यांची नावे
पुजा भास्कर पाटील (वय-19), राम ललीत शुक्ला (25), मिलिंद पुरुषोत्तम गायकवाड (42), चांगदेव भांडवलकर (55), पिकेश लालचंद खंडेलवाल (28), अंकुश तिकोणे(46), श्वेता धवल ओसवाल(28), अक्षय प्रमोद पिस(20), शुंभागी सुयर्कांत मोरे या व्यक्ती घटनेत मृत्यमुखी पडल्या. याप्रकरणी माने याच्यावर स्वारगेट पोलीस चौकीत भारतीय दंडविधान संहिता कायदा कलम 302,307, 324, 326,381 व सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल आहे. अजित गोविंद लिमये (54) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली असून सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोहीते यांनी घटनेचा तपास अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.