आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेदरकार एसटी चालवून 9 जणांचा बळी घेणार्‍या संतोष मानेला फाशीची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बेदरकारपणे एसटी चालवून 9 जणांचा बळी घेतानाच 39 जणांना जखमी करणारा चालक संतोष माने यास अतिरिक्त सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हत्या आणि हत्येच्या प्रकरणी ही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

याआधी बुधवारी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. न्यायाधीश व्ही.के. शेवाळे यांनी हा निकाल दिला. खून, खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, शासकीय साधनांचा दुरुपयोग अशी कलमे मानेविरुद्ध लावण्यात आली होती. या प्रकरणी आज ( 8 एप्रिल) त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
स्वारगेट डेपो नियंत्रकांनी चालकांचा तुटवडा असल्याने मानेला ड्यूटी बदलून दिली नव्हती. त्यामुळे 25 जानेवारी 2012 रोजी माने याने डेपोतील एसटी (एमएच 14 बीटी 1532) चोरून नेऊन रस्त्यावर धुमाकूळ घातला होता.

मानेला दोषी ठरवताना बुधावारी न्यायाधीश शेवाळे म्हणाले की, मानेची प्रकृती स्थिर होती. त्याला कोणताही मानसिक आजार नव्हता. आदल्या दिवशी त्याने गाणगापूरहून पुण्याला एसटी योग्य रीतीने आणली. घटनेच्या दिवशी वाहन चालवताना तो लोकांना मारत सुटला होता. कोणत्याही इमारतीला त्याने वाहन धडकवले नाही. या अर्थी तो सर्व गोष्टी जाणूनबुजून करत होता. अशा निर्घृण गुन्ह्यानंतर तो वेडा आहे, असे म्हणता येणार नाही. सोलापूरचे डॉ. दिलीप बुरूटे यांनी मानेवर उपचारासंबंधी न्यायालयात दाखल केलेली औषधोपचाराची कागदपत्रे बनावट आहेत. त्याला कोणतेही भास होत नसून, तो आजारीही नाही, असा अहवाल डॉक्टरांनी नंतर न्यायालयात सादर केला होता. एकंदर परिस्थितीजन्य पुरावे पाहता माने दोषी असल्याचे सिद्ध होते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
यावेळी सरकारी वकील उज्वला पवार व बचाव पक्षाचे वकील धनंजय माने न्यायालयात उपस्थित होते.