आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमण्णांच्या सुंद्रीवादनाने सवाई महोत्सवाचा प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सोलापूरचे प्रसिद्ध कलाकार भीमण्णा जाधव यांच्या सुरेल सुंद्रीवादनाने सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची गुरुवारी उत्सवी सुरुवात झाली. सुंद्रीसारखे दुर्मिळ वाद्य या महोत्सवात सादर करून एक वेगळ्या प्रकारचा स्वरानंद मिळाल्याची भावना रसिकांनी या वादनानंतर व्यक्त केली. जाधव यांनी सुंद्रीवर सादर केलेला राग भीमपलास ‘सवाई’च्या ६२ व्या स्वरसोहळ्याची सुंदर सुरवात करणारा ठरला.
घराण्यातच सुंद्रीवादनाची परंपरा असणा-या भीमण्णा जाधव यांनी रागवाचक आलापीतूनच भीमपलासचे रूप उभे केले. फुंकवरील नियंत्रण, उत्तम रियाजातून आलेली श्वासावरील कमांड त्यांच्या वादनातून जाणवत होती. त्यांना
वादनाला पूरक अशी साथ एस. देसाई कल्लूर (तबला), शंकर, शैलेश, यशवंत जाधव व व्यंकटेश माने आदींनी केली.

आक्रमक 'श्री' सादरीकरण : गायिका सानिया पाटणकर यांनी ‘सवाई’मध्ये प्रथमच गायन सादर केले. त्यांनी सादर केलेला राग श्री आक्रमक स्वरूपाचा वाटला. ‘कहा मै गुरू ढूंढन जाऊ’ या पारंपरिक रचनेनंतर, पाटणकर यांच्या गुरू डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांची बंदिश ‘गुरबिन कौन बतावे बांट’ आणि डॉ. अरविंद थत्ते रचित सरगमगीत त्यांनी सादर केले. त्यानंतर मिश्र खमाजमधील टप्पा आणि ‘रूप पाहता लोचनी’ हा अभंगही त्यांनी पेश केला. त्यांना अविनाश पाटील (तबला) आणि रोहित मराठे (हार्मोनिअम) यांनी साथ केली.बनारस घराण्याचे गायक प्रभाकर आणि दिवाकर कश्यप यांनी ‘अमरप्रिया’ या उस्ताद आमीर खॉ प्रणित रागाची प्रस्तुती केली. उत्तरार्धात पं. शिवकुमार शर्मा यांच्या अप्रतिम संतूरवादनाने रसिकांना माेहिनी घातली. त्यांना तबल्यावर पं. विजय घाटे यांनी साथसंगत केली.